मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायामध्ये सुरू असलेल्या तंट्यामुळे मागच्या दीड महिन्यापासून राज्यात हिंसाचार उसळला आहे. मणिपूरच्या शेजारी असलेल्या मिझोराम राज्यातील लोकांचे कुकी समुदायाशी वांशिक संबंध आहेत. मिझोराममधील लोकही मणिपूरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ३ मे पासून मणिपूरमध्ये हिंसाचाराची सुरुवात झाली, तेव्हापासून मिझोराममधील सर्वपक्षीय राजकीय नेते, आपापसातील मतभेद विसरून कुकी समुदायाने केलेली वेगल्या प्रशासनाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देत आहेत. तसेच मिझोराममधील पुढाऱ्यांनी मणिपूरमधील बलाढ्य मैतेई समाजावरदेखील कडाडून टीका केली आहे. मार्च २०२२ साली मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला संपुर्ण बहुमत मिळालेले आहे. ६० पैकी भाजपाच्या ३२ आमदारांनी विजय मिळवला होता. अपक्ष ३, काँग्रेस ५, जनत दल (युनायटेड) ६ आणि कुकी पिपल्स अलायन्स पक्षाला २ जागांवर विजय मिळवता आला होता. मोठ्या विजयानंतर भाजपाचे बिरेन सिंह हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. हे वाचा >> पंतप्रधान मन की बात ऐवजी ‘मणिपूर की बात’ कधी करणार? मणिपूर भारताचाच भाग आहे ना? विरोधकांचे सरकारला प्रश्न पण मिझोराममधील नेते कुकीसोबत असलेले वांशिक संबंध असल्याचे सांगूनही सार्वजनिकरित्या बोलायला तयार नाहीत. मिझोरामधील एकमेव राज्यसभेचे खासदार आणि सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) पक्षाचे नेते के. वनलाल्वेना हे सातत्याने या विषयावर बोलत असून त्यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवाटी लावण्याची मागणी केली. एमएनएफ हा एनडीएमधील घटकपक्ष आहे. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. वनलाल्वेना यांनी मुलाखतीत जोर देऊन सांगितले की, केंद्राने आतातरी हस्तक्षेप केला पाहीजे. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मणिपूरमधील सद्यस्थिती आणि मिझोरामच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. प्र. मणिपूरमध्ये ४० दिवसांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे, याच्यातून बाहेर कसे पडणार? हिंसाचार संपविण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर मैतेई आणि आदिवासी जमात कुकीसाठी वेगवेगळ्या प्रशासनाची घोषणा करावी. त्या दोन्ही जमातींना एकमेकांपासून सरंक्षण हवे आहे. मैतेईंची लोकसंख्या अधिक असली तरी त्यांना सरंक्षणाची गरज आहे. त्याचपद्धतीने कुकी या आदिवासी जमातीलादेखील सरंक्षण हवे आहे. दुसरा मार्ग म्हणजे, माझ्या वैयक्तिक मतानुसार तिथे राष्ट्रपती राजवट घोषित करावी. तिथे अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे आणि आता बिरेन सिंह यांचे सरकार बरखास्त करण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती घोषित करावी आणि केंद्रीय सुरक्षा बलांना पुढची जबाबदारी द्यावी. या दोन पद्धतीने तिथे शांतता प्रस्थापित होऊ शकते. आतापर्यंत दोन्ही समुदायांचे खूप नुकसान झाले आहे. प्र. जवळपास १० हजार शरणार्थींनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे, राज्यातील परिस्थिती कशी आहे? फक्त मणिपूरच नाही, त्यांच्याशिवाय म्यानमारमधील जवळपास ३० हजार शरणार्थी मिझोराममध्ये आहेत. बांगलादेशचे दोन हजार शरणार्थी आहेत. आम्ही आमच्यापरीने त्या सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आमचे राज्य काही श्रीमंत नाही. महामारीने सर्वांच्याच अर्थव्यवस्थेचे नुकसान केले. एका एनजीओने मदतनिधी उभारला, पण तेवढासा पुरेसा नाही. मध्यंतरी मिझोरामचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून निधी मिळावा, अशी विनंती करून आले. गृहमंत्र्यांनी सांगितले की, देशातील नागरिकांचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे, मात्र अद्याप निधी किती देणार याचा आकडा जाहीर केलेला नाही. हे ही वाचा >> विश्लेषण : मणिपूरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होईल? प्र. मणिपूरमधील निर्वासित लोकांना मदत करण्यासाठी मिझोराम सरकारने काय पावले उचलली? आम्ही एक पथक स्थापन केले असून ते मणिपूरमधील विस्थापितांची सोय करत आहे. तसेच शिक्षण विभागाला सूचना देऊन विस्थापित मुलांना शाळेत सामावून घेऊन त्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ देऊ नये, असेही सांगितले आहे. पण प्रत्यक्षात हा निर्णय हा जरा अवघड आहे. कारण एमबीबीएसच्या मुलांना सामावून घेण्याची क्षमता आमच्याकडे नाही, कारण इथेच कमी जागा आहे. मिझो स्टुडन्ट युनियन, मिझो झिरलाई पॉल, यंग मिझो असोसिएशन या संस्था एकत्रितपणे काम करत असून आश्रय शिबिरे उभारणे, निधी गोळा करणे इत्यादी कामे करत आहेत. राज्य सरकारपेक्षाही या संस्थांनी केलेले काम मोठे आहे. प्र. मणिपूरच्या अंतर्गत प्रश्नामध्ये मिझोराम ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला जात आहे? आम्ही आणि ढवळाढवळ? कुकी आमचे भाऊबंद आहेत म्हणून का? कुकी लोक आमच्याच वंशाचे आहेत. आम्ही एकमेकांना स्नेहाने वागणूक देतो. मी तर ट्विटरवरही लिहिले होते की, कुकी यांना वाटत असेल की त्यांचा स्वतःचा खासदार नाही, तरी त्यांनी काळजी करू नये. मी त्यांचा खासदार आहे, असे समजावे.