कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस पक्षाचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. दरम्यान, काँग्रेस, भाजपा आणि जेडीएस या तिन्ही पक्षांना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. येथे काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपा आणि जेडीएस पक्षांकडून विशेष रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज (२२ सप्टेंबर) दिल्लीमध्ये भाजपाने जेडीएस पक्षाशी युती झाल्याची घोषणा केली.
जेपी नड्डा यांनी केली घोषणा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा जेडीएस पक्षाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर नड्डा यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) या युतीची घोषणा केली. नड्डा यांनी अमित शाह तसेच कुमारस्वामी यांच्यासोबतचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. तसेच या पोस्टमध्ये “जेडीएस पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. आम्ही मनापासून जेडीएस पक्षाचे एनडीएमध्ये स्वागत करतो. या युतीमुळे एनडीए आणखी मजबूत होईल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘नवा भारत, मजबूत भारत’ हे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत होईल,” असे नड्डा म्हणाले.




देवेगौडा यांनी घेतली होती अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट
गेल्या काही दिवसांपासून जेडीएस आणि भाजपा यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. ४ सप्टेंबर रोजी जेडीएस पक्षाचे नेते तथा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.
“…तर २५ ते २६ जागांवर आमचा विजय होणार”
याआधी भाजपाचे नेते बीएस येडियुरप्पा यांनी या युतीसंदर्भात भाष्य केले होते. “भाजपा आणि जेडीएस यांच्यात युती होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जेडीएस पक्षाला चार जागा देण्यास संमती दर्शवली आहे. या युतीमुळे आम्हाला बळ मिळणार आहे. या युतीमुळे कर्नाटकमधील २५ ते २६ जागांवर आमचा विजय होऊ शकतो,” असे येडियुरप्पा म्हणाले होते. यावेळी त्यांनी जेडीएस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चार जागा दिल्या जातील. या युतीमुळे आमचा २५ ते २६ जागांवर विजय होईल, असेही येडियुरप्पा म्हणाला होते.
काँग्रेस पक्ष या युतीचा कसा सामना करणार?
दरम्यान, जेडीएस-भाजपाच्या या युतीमुळे कर्नाटक राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष या युतीचा कसा सामना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.