scorecardresearch

Premium

जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणात एकनाथ खडसेंच्या कोंडीचा प्रयत्न

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे समर्थक आणि खडसेंचे विरोधकच होते. ऑगस्टअखेर औरंगाबाद खंडपीठाने प्रशासक मंडळ नियुक्ती अवैध ठरवून संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले.

Jalgaon District Milk Union eknath khadse girish mahajn shinde fadanvis government jalgaon

दीपक महाले

जळगाव : सहकार क्षेत्रात जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेनंतर सर्वांत मोठ्या असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. दूध संघातील गैरकारभारासह गैरव्यवहाराच्या झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या आतषबाजीमुळे सहकार क्षेत्रातील या संघात शेतकर्‍यांचा नव्हे; तर राजकारण्यांचा विकास होत असल्याची चर्चा जिल्हाभरात रंगली आहे. राजकीय वर्चस्वासाठी लढल्या जाणाऱ्या या लढाईत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांना घेरण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत.

Hasan Mushriff
“भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”
hasan mushrif
पालकमंत्री शिंदे गटाचे असताना शेतकरी संघाचे कुलूप तोडण्याचे धाडस केलेच कसे? हसन मुश्रीफ यांची विचारणा
A march will be held at the house of Guardian Minister Backward Classes Commission Chairman and local MLAs in chandrapur
पालकमंत्री, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व स्थानिक आमदारांच्या घरावर तिरडी मोर्चा काढणार; ओबीसींच्या बैठकीत आंदोलन निर्णय
OBC movement
मराठा समाजाला एक तर ओबीसींना दुसरा न्याय का? ओबीसी नेत्यांचा सरकारला सवाल

आमदार खडसेंचे वर्चस्व असलेल्या दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपली होती. परंतु, करोनामुळे मुदतवाढ देण्यात आली. संघात सद्यःस्थितीत खडसेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनलची सत्ता आहे. त्यांच्या संचालक मंडळात शिंदे गटातील आमदारांचाही समावेश आहे. मध्यंतरी संघाची निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली होती. राज्यात सत्तांतर नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून २८ जुलै रोजी अचानक दूध संघातील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश निघाले. त्याअंतर्गत संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश उपसचिवांनी दिले. प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. मुख्य प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण होते. मंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे समर्थक आणि खडसेंचे विरोधकच होते. ऑगस्टअखेर औरंगाबाद खंडपीठाने प्रशासक मंडळ नियुक्ती अवैध ठरवून संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा :पुणे विमानतळाच्या वादात शरद पवारांनी घातले लक्ष. विकास कामावरून राजकीय संघर्ष पेटणार?

यानंतरही संघात शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. दूध संघातील गैरव्यवहार आणि चोरीच्या विषयावरून आमदार चव्हाण आणि खडसे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चव्हाणांनी दूध संघाचा प्रश्‍न कोणत्याही चौकात मांडण्यापेक्षा विधानसभेत मांडावा आणि हे प्रकरण अपहाराचे नसून, चोरीचे आहे, असा खडसे यांचा दावा आहे. दूध संघाच्या पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करायची असेल, तर ती पोलीस प्रशासनाऐवजी सहकार विभागाने करावी. राज्यात सरकार त्यांचे आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर विधानसभेत त्यांनी हे मुद्दे मांडावेत, असे आव्हानही खडसेंनी चव्हाणांना दिले. चव्हाण हे दूध संघाला आणि आपल्या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही खडसेंनी केला. चोरीचा तपास सोडून दूध संघाच्या चौकशीचा अधिकार पोलिसांना कुणी दिला, असा प्रश्न करीत पोलीस प्रशासन सत्ताधारी व्यक्तीच्या तालावर नाचत असल्याची टीकाही त्यांनी केली. दूध संघात गैरव्यवहार झाला असेल तर कुठल्याही संस्थेकडून चौकशी करा, सर्व चौकशीला तयार असल्याचे खडसेंनी आव्हान दिले आहे.

दुसरीकडे, आमदार चव्हाण यांनीही खडसे परिवारासह मोठ्या टोळीचा याप्रकरणात समावेश असून, टोळीचे प्रमुख खडसे असल्याचा आरोप केला आहे. ज्यांच्याविरुद्ध आपली तक्रार आहे, तेच आंदोलन करतात. तेच पोलीस ठाण्यात तक्रार देतात, हे आश्‍चर्यकारक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. दूध संघात चोरी नव्हे; तर अपहार झाला आहे, तो अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांनीच केला असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचा :अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात सोसायटीधारकांच्या ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू

चव्हाण यांच्या तक्रारीनुसार संघातील कथित चोरी आणि अपहार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय अन्नसुरक्षा मानक प्राधिकरणाच्या मुंबईस्थित कार्यालयातील अधिकार्‍यांनी संघात धडक देत लोण्याचे नमुने घेत सहा टन लोण्याच्या साठ्याच्या विक्रीस बंदी घातली. त्यांनी उत्पादनाची प्रक्रिया जाणून घेत उत्पादनाच्या साठा नोंदीसह विक्री व्यवहाराच्या नोंदीची कागदपत्रेही ताब्यात घेतली. त्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस पथकाकडून संघातील तब्बल पाच वर्षांतील कागदपत्रांची तपासणी केली जात असून चोरीची घटना आताची असताना पोलिसांकडून पाच वर्षांतील कागदपत्रे का तपासली जात आहेत, असा आक्षेप दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

दरम्यान, दूध संघाची अंतिम प्रारूप मतदारयादीही जाहीर झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाने दूध संघ ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरु केली असून त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण अधिकच तापणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jalgaon district milk union eknath khadse girish mahajn shinde fadanvis government jalgaon print politics news tmb 01

First published on: 26-10-2022 at 10:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×