पीटीआय, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजप पूर्ण करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत दिली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे येथील युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, लोकशाहीवरील त्यांचा विश्वास दृढ झाल्याचे मोदी यांनी शेर-ए-काश्मीर स्टेडियममधील सभेत सांगितले.

काश्मीरमध्ये तीन कुटुंबांनी स्वहित साधले अशी टीका त्यांनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स तसेच पीडीपीवर केली. आपल्या कुटुंबाखेरीज अन्य कोणाचा हे विचार करत नाही असा टोला त्यांनी लगावला. गांधी, अब्दुल्ला तसेच मुफ्ती कुटुंबावर त्यांनी जोरदार टीका केली. गेल्या पाच वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. पूर्वी काश्मीरमध्ये प्रचार सहा वाजता संपत होता. आता परिस्थिती बदलली आहे. पहिल्या टप्पात विक्रमी मतदान झाले ही अभिमानाची बाब आहे. दहशतीशिवाय मतदारांनी हक्क बजावला. अनेक ठिकाणी ७० ते ८० टक्के मतदान झाले हे ऐतिहासिक आहे. दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबरला हा विक्रम मोडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ३५ वर्षांत काश्मीर तीन हजार दिवस बंद होते. थोडक्यात जवळपास आठ वर्षे व्यवहार ठप्प होते. मात्र गेल्या पाच वर्षांत आठ तास देखील बंद झालेला नाही असे पंतप्रधानांनी नमूद केले.

हेही वाचा : कधीकाळी मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या गावात यंदा मतदानासाठी लांबच लांब रांगा; जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे?

‘काँग्रेस नेतृत्वाकडून देवतांचा अपमान’

कटरा: विधानसभा निवडणुकीत सूज्ञपणे मतदान करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथील सभेत केले. ही निवडणूक काश्मीरचे भविष्य घडविणारी असून, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स तसेच पीडीपीने या विभागाचे नुकसान केले आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला. सुनियोजित पद्धतीने काँग्रेस नेतृत्वाने हिंदू देवतांना अपमान केल्याची टीका पंतप्रधानांनी केली. त्यामुळे मतदारांनी त्यांना धडा शिकवावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये पंतप्रधानांची ही तिसरी प्रचारसभा होती. यापूर्वी १४ सप्टेंबरला डोडा येथे तर गुरुवारी सकाळीच श्रीनगरमध्ये प्रचारसभा झाली.