जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे मतदारसंघांच्या परिसीमनानंतर ९० पैकी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आणि दुसरी म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात अनुसूचित जमातींच्या यादीत आणखी चार जातींचा समावेश करण्यात आला. हे दोन्ही निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आले. त्यामुळे याचा फायदा भाजपाला होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता अनुसूचित जमातींत चार जातींचा समावेश करण्याच्या निर्णयाला गुज्जर व बकरवाल या समाजांकडून विरोध होतो आहे. त्यामुळे भाजपासाठी विधानसभेची वाट बिकट होईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
विधासभेच्या एकूण ९० जागांपैकी ज्या नऊ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा जागा या जम्मू प्रदेशात आहेत. या भागातील पूंछ व राजौरी या जिल्ह्यांत गुज्जर व बकरवाल यांची संख्या सर्वाधिक आहे. हा मुख्यत: मुस्लीम समाज आहे आणि विशेष म्हणजे काश्मीर खोऱ्यातील मुस्लिमांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून या दोन्ही समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. मात्र, अनुसूचित जमातींत चार जातींचा समावेश केल्याने भाजपासाठी या भागात आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे.
खरं तर गुज्जर समाजाला आकर्षित करण्याचा हा भाजपाचा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी भाजपाने काही नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळविले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गुज्जर नेते अब्दुल घनी कोहली यांनी काला कोटा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. इतकेच नव्हे, तर भाजपा-पीडीपी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. त्याशिवाय राजौरी मतदारसंघातून भाजपाने गुज्जर उमेदवार चौधरी तालीब हुसैन यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा २५०० मतांनी पराभव झाला होता. अशातच आता भाजपाकडून आणखी काही गुज्जर नेत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकीकडे भाजपाकडून गुज्जर व बकरवाल या समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे काही राजकीय पक्षांकडून मात्र धार्मिक आधारावर गुज्जर, बकरवाल व पहाडी मते भाजपाविरोधात कशी जातील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जम्मू-काश्मीरमध्ये धार्मिक आधारावर मतदान झाल्याचे बघायला मिळाले होते. या निवडणुकीत हिंदूबहुल जम्मूमध्ये भाजपाला सर्वाधिक मते मिळाली होती. तर मुस्लीमबहुल काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीला सर्वाधिक मते मिळाली होती.
जम्मू-काश्मीरच्या राजकीय इतिहासात ही पहिली वेळ आहे, जेव्हा विधानसभेत अनुसूचित जातींसाठी नऊ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा जागांवर खरी लढत होईल, असे सांगितले जात आहे. भाजपाने या सहा जागांवरील लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामध्ये राजौरी, बुधल, थन्नामंडी, सुरनकोट, मेंढर व गुलाबगड या जागांचा समावेश आहे. यापैकी थन्नामंडी हा मतदारसंघ २०२२ मध्ये तयार करण्यात आला आहे; तर उर्वरित जागांपैकी पीडीपी आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन, नॅशनल कॉन्फरन्सकडे एक मतदारसंघ आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला यापैकी एकही जागा जिंकता आलेली नव्हती.
सहा मतदारसंघांची राजकीय परिस्थिती
राजौरी : राजौरीमध्ये भाजपाने विबोध कुमार गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने पक्षाचे सरचिटणीस इफ्तकार अहमद आणि पीडीपीने तसादिक हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी गुप्ता हे पहाडी हिंदू आहेत, तर इफ्तकार अहमद हे पहाडी मुस्लीम आहेत. तसेच, हुसेन हे गुज्जर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजौरीमध्ये काँग्रेसला धार्मिक ध्रुवीकरणाची अपेक्षा आहे; ज्याचा भाजपाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सुरनकोट : पूंछमधील सुरनकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाने मुश्ताक अहमद शाह बुखारी यांना उमेदवारी दिली आहे; तर काँग्रेसने मोहम्मद शाहनवाज यांना उमेदवारी दिली आहे. बुखारी हे पहाडी समाजाचे, तर मोहम्मद शाहनवाज हे गुज्जर समाजाचे नेते आहेत. त्याशिवाय आणखी दोन गुज्जर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी एक पीडीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहे.
थन्नमंडी : राजौरी जिल्ह्यातील थन्नामंडीमध्ये एक गुज्जर उमेदवार विरुद्ध तीन पहाडी उमेदवार, असा सामना रंगणार आहे. या ठिकाणी पीडीपीने कमर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. ते गुज्जर नेते आहेत. तर, काँग्रेसने मोहम्मद शाबीर खान आणि भाजपाने मोहम्मद इक्बाल मलिक यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही पहाडी नेते आहेत. त्याशिवाय एक अपक्ष पहाडी उमेदवारही रिंगणात आहे.
मेंढर : मेंढरमध्ये एनसीने विद्यमान आमदार जावेद अहमद राणा यांना उमेदवारी दिली आहे. ते गुज्जर नेते आहेत. तर, भाजपाने मूर्तझा अहमद खान यांना उमेदवारी दिली आहे. ते पहाडी नेते आहेत. तसेच पीडीपीने नदीम अहमद खान यांनी उमेदवारी दिली आहे. तेही पहाडी नेते आहेत. त्याशिवाय इश्फाक चौधरी हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ते गुज्जर समाजाचे नेते आहेत.
बुधल : बुधलमध्ये तीनही प्रमुख उमेदवार गुज्जर समाजातील आहेत. भाजपाने चौधरी झुल्फिकार अली, एनसीने जावेद इक्बाल चौधरी व पीडीपीने गुफ्तार अहमद चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
गुलाबगड : गुलाबगढमध्ये एनसीने खुर्शीद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने मोहम्मद अक्रम खान यांना, तर पीडीपीने मोहम्मद फारुख यांना उमेदवारी दिली आहे. हे तिन्ही उमेदवार गुज्जर समाजाचे नेते आहेत.