पुणे : बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे युवा नेते हे पुन्हा बारामतीत सक्रिय झाले आहेत. ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ या वक्तव्याने बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या काळात चर्चेत आलेले जय पवार यांनी आता बारामतीत सलग साडेसहा तास ‘जनसंवाद’ करून बारामतीकरांबरोबर संपर्काला सुरुवात केली आहे.
बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार यांच्यावर सोपविण्यात आली होती. काँग्रेसविषयी विधानामुळे वादात सापडलेले नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांना ‘राष्ट्रवादी’ने प्रचारापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. निवडणूक प्रचाराच्या काळात जय पवार यांनी बारामतीत गावोगावी हिंडून मतदारांशी संपर्क साधला.
मात्र, ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ या वक्तव्याने भाऊबंदकी उफाळून आली. आमदार रोहित पवार यांनी पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते, असे विधान केले. त्यानंतर बारामतीचे तिसऱ्या पिढीचे नवे नेतृत्व रोहित, पार्थ, युगेंंद्र की जय पवार अशी चर्चा सुरू झाली. आता बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच जय पवार हे बारामतीत पुन्हा सक्रिय झाले आहेत.
‘मॅरेथॉन’ जनसंवादाची चर्चा
जय पवार यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सलग सुमारे साडेसहा तास ‘मॅरेथॉन’ जनसंवाद साधला. त्यामध्ये जिल्हा परिषद गट आणि माळेगाव नगरपंचायतीतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यामुळे भविष्यात जय पवार हे बारामतीत सक्रिय होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवार यांंची ‘जनसंवादा’ची परंपरा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जनसंवाद’ हा उपक्रम राबवून जनसंपर्काचा वस्तुपाठ घालून दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या ‘जनसंवादा’ला १३ सप्टेंबर २०२५ पासून पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघापासून आरंभ करण्यात आला. त्यामध्ये पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेवून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे जनसंवादाला भरघोस प्रतिसाद लाभला.
अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यानीही जनसंवाद उपक्रम सुरू केला. त्यांनी जनसंवादातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. आता अजित पवार यांची ही जनसंवादाची परंपरा राखण्यास जय पवार यांनी बारामतीत सुरुवात केली आहे.
