सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या संस्था, निकटच्या कार्यकर्त्यांना विविध गैरव्यवहारातून संशयाच्या भोवऱ्यात पकडण्याचे कामही वेगाने घडत आहे. या दोन्ही दिशांचा वेध घेतला तर ही त्यांच्या प्रवेशासाठीची अगतिकता आहे की त्यांची केलेली राजकीय कोंडी हा प्रश्न सध्या तरी पडत आहे.

आ. पाटील यांचे समर्थक सांगली बाजार समिती सभापती होताच, त्रिभाजनसाठी समितीचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले. यानंतर आमदार पाटील गटाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या चौकशी सुरू झाली आहे. नोकरभरती वरून विद्यमान संचालक मंडळाचे अधिकारच गोठविण्याचे प्रयत्न सुरू असताना बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ईश्वरपूरचे थेट नगराध्यक्ष आनंद मलगुंडे यांना अपात्रतेचा धक्का दिला. जयंत पाटील यांच्याशी संबंधित संस्था, व्यक्तींबाबत एकीकडे या साऱ्या राजकीय घटना घडत असतानाच दुसरीकडे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. या साऱ्या घटना पाहिल्या तर मग यामागे दबाव आहे की हतबलता याचीही चर्चाही रंगली आहे.

आमदार पाटील यांनी अलीकडच्या काळात विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जुळवून घेण्याचे प्रयत्न केले. यासाठी प्रसंगी स्वत:च्या ताकदीला आवर घालून महापालिका निवडणुकीत कमी जागा घेतल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप वगळून अन्य राजकीय पक्षांना एकत्रित आणून प्रसंगी एकमेकांविरुद्ध लढत होणार नाही, याची दक्षता घेतली. महापालिका निवडणुकीवेळी महायुतीतील घटक पक्षातच फूट दिसून आली. मात्र, भाजप विरोधाची धार कायम ठेवत निवडणुका लढविल्या गेल्या. तालुका पातळीवर ज्या नेत्यांचे वर्चस्व आहे, त्यांना खुलेपणा देत असताना पडद्याआडचे राजकारण होणार नाही, असा विश्वास देत प्रत्यक्षात तो दर्शवला.

जिल्हा बँक, बाजार समिती या जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाच्या संस्था, यामध्ये पक्षापेक्षा स्वत:चा गट करण्यावर त्यांचा भर असतो. यामुळेच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात भाजपचेही संचालक सत्ताधारी गटात आहेत. तर काही संचालक काल परवा भाजपमध्ये डेरेदाखल होवून व्यासपीठावर खुर्ची मिळवते झाले. तरीही बँकेच्या कारभारावर याचा परिणाम दिसलेला नाही. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी लावून धरत संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली. यासाठी मोर्चाही काढला. मात्र, वरिष्ठ स्तरावरून या मागणीची दखल घेतली नाही. मात्र संचालक मंडळाच्या नोकरभरतीला शासनाकडून स्थगिती मिळवली. ही स्थगिती न्यायालयाने उठविल्याने आ. पडळकर, आ. खोत यांचा डाव अयशस्वी ठरला.

याच दरम्यान, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष मलगुंडे व त्यांचे बंधू आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांचे सदस्यत्व अतिक्रमणाच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अवैध ठरले. हा आमदार पाटील यांच्यासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. एकूणच जयंत पाटील यांच्याशी संबंधित संस्था, व्यक्तींबाबत एकीकडे या साऱ्या राजकीय घटना घडत असतानाच दुसरीकडे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. या साऱ्या घटना पाहिल्या तर मग यामागे दबाव आहे की हतबलता याचीही चर्चाही रंगली आहे.