scorecardresearch

मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

एकंदरीत रविवारी इस्लामपुरात झालेला विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक राजकीय कार्यक्रम करण्यात जयंत पाटील यशस्वी ठरले.

मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

दिगंबर शिंदे

सांंगली : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा हंगाम, लांबणीवर पडलेली नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या संभाव्य निवडणुका या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाच्या विवाह थाटामाटात पार पडला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आ. पाटील यांनी राज्यभर गोतावळा तर तयार केला आहेच, पण या विवाहाच्या निमित्ताने राजकीय पातळीवर आपले स्नेहबंध किती घट्ट विणले आहेत हे या निमित्ताने दाखवून देण्यात आले.

चार दशकापूर्वी धरणासाठी चांदोली की खुजगाव यावरून वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात राजकीय संघर्ष होता. हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी बापूंच्या पश्‍चात जयंत पाटील यांना राजकीय प्रवेश सुकर करून देण्याचा प्रयत्न वसंतदादांनी केला. मात्र, सुप्तावस्थेत असलेला हा संघर्ष आजही सुरू आहे. जिल्हा पातळीवर बँक, बाजार समिती असो वा महापालिका, जिल्हा परिषद असो हा राजकीय संघर्ष कधाीही उफाळून येत असतो. आजच्या घडीला राज्यपातळीवर जयंत पाटील यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले असले तरी गत लोकसभा निवडणुकीमध्ये दादा घराण्याचे वारसदार विशाल पाटील यांना मिळालेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. जत, आटपाडी, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज तालुुक्यातील दादा गट कार्यरत आहे. मात्र, बापूंनी जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात ताकद देत आपला गट निर्माण केला होता. यातूनच महांकाली, जत कारखान्याची उभारणी झाली होती.

हेही वाचा: कुस्तीगीर परिषदेतही राजकीय आखाडा

आता दादांची तिसरी पिढी जशी राजकीय क्षेत्राात कार्यरत आहे, तशीच बापूंचीही तिसरी पिढी राजकारणाच्या उंबरठ्यावर उभी आहे. जयंत पाटील हे राज्य पातळीवर कार्यरत असल्याने स्थानिक पातळीवर कारखाना असो वा नगरपालिका यामध्ये वारसदार म्हणून प्रतिक पाटील कार्यरत आहेत. युवा नेतृत्व म्हणून तालुुक्यात व जिल्ह्यात पाहिले जात असले तरी जिल्ह्याचे नेतृत्व करण्यास अजूनही काही काळ जावा लागणार आहे. जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत त्यांना डॉ. विश्‍वजित कदम, विशाल पाटील, रोहित आर. आर. पाटील यांच्याशी सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा: रणजीतराजे भोसले : अभ्यासू नेता

या पार्श्‍वभूमीवर विवाहाच्या निमित्ताने प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाचे महत्व प्रस्थापित व्हावे हा हेतूही गुलदस्त्यात असला तरी लपून राहिला नाही. मतदार संघात उंबराठोक लग्नपत्रिका वाटप असो वा राज्य पातळीवरील दिग्गजांना लग्नांचे खास आमंत्रण असो यामागे युवा नेतृत्व ठसविण्याचा प्रयत्नच होता. आता नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने, एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रतिक पाटील लोकासमोर जात आहेतच, पण त्यांना केवळ जयंतपुत्र अशी ओळख मिळण्याऐवजी स्वतंत्र ओळख मिळाली तरच ते जिल्ह्याच्या राजकारणात अधिक सक्रिय होऊ शकतात. राजकीय संधी घरच्या वारशामुळे लवकर मिळेलही पण यासाठी वेगळा मतदारसंघही शोधावा लागणार आहे. तशी तयारीही सुरू होती.मात्र, हा प्रवास अधिक काट्याकुट्यांचा ठरण्याची शययता असल्याने घरच्या मैदानावर स्थिरस्थावर करून पुढची झेप घेण्याची तयारी असावी.

हेही वाचा: उद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून! पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो

एकंदरीत रविवारी इस्लामपुरात झालेला विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक राजकीय कार्यक्रम करण्यात जयंत पाटील यशस्वी ठरले. जयंत विरोधक एकत्र येण्यास यामुळे काहीसा प्रतिबंध घालण्याचा प्रयत्नही यामागे होताच, पण याचबरोबर राजकीय ताकद अजमावण्याबरोबरच मतदार संघातही शक्तीप्रदर्शन करण्याचा हेतू लपून राहिला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:16 IST

संबंधित बातम्या