मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेतृत्व करणाऱ्या अलिबागच्या (रायगड) पाटील कुटुंबातही राजकीय कलह निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात ‘शेकाप’चे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात पाटील कुटुंबियांतील दोघा माजी आमदार बंधूंमध्ये जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर जोरदार बाचाबाची झाली. या कलहास आगामी विधानभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी हे कारण आहे.

पंढरपुरातील पक्ष अधिवेशनात पक्षाचे प्रमुख भाई जयंत पाटील यांना त्यांचे सख्खे लहान बंधू माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडीत पाटील यांनी आव्हान दिले. पक्षात तुम्ही दादागिरी करु नका, या शब्दात पंडीत पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावले. दोघा बंधूंमध्ये व्यासपीठावर बाचाबाची झाली. उपस्थितांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.

हेही वाचा – शिंदे गटाकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांचे लक्ष्य भाजपच

उद्योजक असलेले भाई जयंत पाटील हे चारवेळा विधान परिषदेवर राहिलेले आहेत. राज्यातील तिसऱ्या आघाडीची त्यांनी पडद्याआडून सुत्रे हलवली आहेत. आता त्यांना त्यांच्या सूनबाई चित्रलेखा पाटील यांना अलिबाग विधानसभेची उमेदवारी द्यायची आहे. लहान बंधू पंडीत पाटील हे २०१४ मध्ये अलिबागचे आमदार होते. ते यावेळीही इच्छुक आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव मला उमेदवारी देत नसेल तर आस्वाद पाटील याला अलिबागची उमेदवारी द्या, अशी पंडीत पाटील यांची मागणी आहे.

चार दशके ‘शेकाप’चा सुकाणू अलिबागच्या मात्तबर अशा पाटील कुटुंबियांच्या हाती आहे. मिनाक्षी, जयंत आणि पंडीत या तिघांमध्ये आमदारकी, जिल्हा परिषद आणि विधान परिषद अशी अलिखीत राजकीय वाटणी होती. पक्ष सध्या अस्तित्वासाठी धडपडतो आहे. ‘लोहा’चे श्यामसुंदर शिंदे हे एकमेव पक्षाचे आमदार आहेत. ‘शेकाप’ने सध्या प्रागतिक पक्ष नावाची राज्यात आघाडी स्थापली असून त्यात १३ पक्ष सहभागी आहेत. दुसरीकडे शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. या विधानसभेला आघाडीकडे ५ मतदारसंघ मागण्याचा ‘शेकाप’चा मानस आहे’.

हेही वाचा – कारण राजकारण: धार्मिक ध्रुवीकरण साटम यांना बाधणार?

पक्षाच्या चिटणीस मंडळात आपला समावेश नसल्याचा गैरसमज निर्माण झाल्याने पंडीत पाटील यांनी सवाल केला. ते माजी आमदार असल्याने चिटणीस मंडळाचे पदसिद्ध सदस्य असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर शांत झाले. अलिबागच्या उमेदवारीवरुन पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. – भाई प्रा. एस. व्ही. जाधव, शेकाप चिटणीस मंडळाचे सदस्य