जयदत्त क्षीरसागर भाजपच्या उंबरठ्यावर | Jaydutt Kshirsagar BJP entry soon Political role In Aurangabad Teachers Constituency print politics news ysh 95 | Loksatta

जयदत्त क्षीरसागर भाजपच्या उंबरठ्यावर

बीड जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांवर तसेच सहकारी संस्थांवर जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व आहे.

Jaydutt Kshirsagar on the threshold of BJP
जयदत्त क्षीरसागर भाजपच्या उंबरठ्यावर

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : गेले काही दिवस राजकीय भूमिका स्पष्ट करण्यास विलंब लावणाऱ्या व तांत्रिकदृष्ट्या अजूनही शिवसेनेत असणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात त्यांचा कल भाजपकडेच असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना मदत केली.

बीड जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांवर तसेच सहकारी संस्थांवर जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व आहे. गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत नाराज असणारे क्षीरसागर पक्ष बदल करतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी भाजपमध्ये अद्याप तरी जाहीर प्रवेश घेतलेला नाही. मात्र, शिक्षक मतदारसंघात त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. या मतदारसंघात बीड जिल्ह्यात नऊ हजार ७०८ मतदारांपैकी आठ हजार ७६३ शिक्षकांनी मतदान केले. क्षीरसागर भाजपच्या उंबरठ्यावर असल्याने आतापर्यंत बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्यासमवेत असणारी ओबीसी राजकारणातील परस्पर पुरकता आता राजकीय स्पर्धत परावर्तीत होईल असे मानले जात आहे.

हेही वाचा >>> “आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम”, मुख्यमंत्री जगन रेड्डींची घोषणा

बीड जिल्ह्यातील राजकारणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संदीप क्षीरसागर यांना बळ दिले. तेव्हापासून जयदत्त क्षीरसागर नाराज होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जयदत्त क्षीरसागर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. तेव्हापासून ते भाजपबराेबर जातील अशी चर्चा सुरू होती. मात्र, भाजप- सेनेची युती असताना मतदारसंघाच्या तडजोडीमध्ये क्षीरसागर यांनी शिवसेनेमध्ये जावे असे त्यांना सूचविण्यात आले.  ते शिवसेनेत गेलेही पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कधी सेनेत रमले नाहीत. अगदी अपरिहार्य असेल अशाच कार्यक्रमांना हजेरी लावून ते परत येत.

हेही वाचा >>> पदवीधर’च्या निमित्ताने नगर जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या वळणावरच, विखे-थोरात संघर्षालाही नवा आयाम

 मात्र, जिल्ह्यात आदर्श शिक्षण संस्था व नवगण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना जोडून ठेवले आहे. या दोन्ही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परिचारिका महाविद्यालय, युनानी प्रशिक्षण यासह शाळा, महाविद्यालये चालविली जातात. या शिवाय सहकार क्षेत्रात तालुका दूध संघ व गजानन नागरी सहकारी बँक तसेच उत्तमपणे चालविली जाणारी मराठवाड्यातील एकमेव सूत गिरीणीचा कारभारही ते पाहतात. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे भगिनींचा प्रभाव असल्याने जयदत्त क्षीसागर भाजपमध्ये आले तरी त्यांचे राजकीय वजन नक्की कसे मोजले जाईल यावरुन त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचलता असते. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवेश न करता जयदत्त क्षीरसागर यांनी आपण भाजपबरोबर आहोत, असे स्पष्ट संकेत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दिले आहेत. पण त्यांचा प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश होईल का, याविषयी शंका घेतल्या जात आहेत.

हेही वाचा >>> नारायण राणे लोकसभा उमेदवार?

दोन ओबीसी नेते एक म्यानात कशाला ?

बीड जिल्ह्याच्या राजकारणात ओबीसी मतदार केंद्रस्थानी असतो. पंकजा मुंडे यांना आतापर्यंत भाजपच्या ओबीसीच्या नेत्या म्हणून मान्यता आहे. त्याच वेळी जयदत्त क्षीरसागर यांचाही संस्थात्मक राजकरणामुळे प्रभाव आहे. हे दोन्ही नेते दोन वेगवेगळया पक्षात असतील तेव्हा ते परस्पर पुरक काम करू शकत होते. पण ते एकाच पक्षात आले तर स्पर्धक बनतील. त्यामुुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊनही क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. ते जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करतील तेव्हा पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्येही राजकीय स्पर्धा सुरू होईल. अशी राजकीय स्पर्धा घडवून आणायची की नाही, हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. पंकजा मुंंडे यांच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या राजकीय कुरघोड्याच्या खेळात जयदत्त क्षीरसागर यांचे नावही स्पर्धक म्हणून पुढे आणले जाते का, याबाबत बीड जिल्ह्यात उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:22 IST
Next Story
समाजवादी पक्षाच्या प्रचारगीतामध्ये मुलायम सिंहांची तुलना देवाशी; तर अखिलेश यादव यांना म्हटले भीष्म व कर्ण