काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी! | Jayveer Shergill who left the Congress and came to the BJP got the responsibility of the National Spokesperson msr 87 | Loksatta

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!

भाजपाकडून मोठी जबाबदारी मिळताच शेरगील यांनी केले आहे ट्वीट, जाणून घ्या काय म्हटलं आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!
(संग्रहित छायाचित्र)

Jaiveer Shergill : काँग्रेसचे सर्वात तरूण आणि प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या ३९ वर्षीय जयवीर शेरगील यांनी ऑगस्ट महिन्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि भाजपात प्रवेश केला होता. यानंतर आता भाजपाने त्यांना राष्ट्रीय प्रवक्ता बनवलं आहे.

भाजपाने एवढी जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी पहिले ट्वीट केले, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी देशाच्या सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांचे, मला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार व्यक्त करतो.

काँग्रेस सोडल्याच्या तीन महिन्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस चापलुसी करणाऱ्यांचा पक्ष असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस सोडताना त्यांनी काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

कॉँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत इथे गुणवत्तेपेक्षा गुलामगिरी महत्त्वाची असल्याचे कारण पुढे केले होते. शेरगील हे व्यवसायाने अॅडव्होकेट असून काही काळापासून ते पक्षासोबत नाखूष होते. ते मूळ जालंदरचे असून यांचा पक्षप्रवेश काँग्रेस पक्षाने २०१४ मध्ये तरूण आणि आश्वासक चेहऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टॅलेंट हंटमधून झाला होता. त्यांची २०१४ मध्ये राष्ट्रीय मीडिया पॅनलिस्ट म्हणून निवड करण्यात आली तर २०१८ मध्ये राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवडले गेले. विधानसभा निवडणुकांदरम्यान छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पक्षाचे संवाद समन्वयक म्हणून काम पाहण्याची संधी देण्यात आली. काही राज्यांत ते पक्षाचे स्टार प्रचारक ठरले होते.

आपण काही जणांच्या लहरी आणि कल्पनाआधारित स्वभावाशी जुळवून घेऊ शकत नसल्याने पक्षाचे कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांमधून बाजूला राहणे पसंत करत असल्याचे त्यांनी सांगितले.“राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या कार्यालयात काही व्यक्ती आहेत.. मी त्यांच्या तालावर नाचू शकत नाही. मी दर आठवड्याला भेट घेऊ शकत नाही किंवा संपर्कात राहू शकत नाही.. जर या कारणांवरून माझी पात्रता ठरत असेल तर मग मी पक्षासाठी योग्य नाही,” असे त्यांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 22:18 IST
Next Story
Gujarat Election: मंदिर, दर्गा आणि आक्रमणकर्ते; पावागडमधील मंदिराचा मुद्दा भाजपासाठी महत्वाचा का आहे?