कर्नाटक राज्यातील जेडीएस पक्षाने भाजपाशी युती केली आहे. या निर्णयानंतर मात्र जेडीएस पक्षातील काही नेते नाराज आहेत. पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतल्यानंतर या पक्षाच्या अनेक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी तर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. असे असतानाच आता पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी ही युती करताना मला विश्वासात घेतले नाही, असे म्हटले आहे. लवकरच इब्राहिम आपल्या समर्थकांसह बैठक घेणार असून,आगामी राजकीय वाटचालीबद्दल निर्णय घेणार आहेत.

युती करताना मला अंधारात ठेवले- इब्राहिम

इब्राहिम यांच्या या विधानानंतर जेडीएस पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी इब्राहिम यांनी काँग्रेस पक्षातून जेडीएसमध्ये प्रवेश केला होता. मुस्लीम समाजातील एक प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपाशी युती करताना मला जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा तसेच त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी अंधारात ठेवले, असा दावा केला आहे. यासह काँग्रेसचे तसेच इंडिया आघाडीतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयू पक्षाचे नितीश कुमार माझ्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

इब्राहिम नेमकं काय म्हणाले?

“देवेगौडा हे माझ्या वडिलासारखे तर कुमारस्वामी हे भावासारखे आहेत. या दोघांप्रति मला आदर आहे. मात्र मला एका गोष्टीचे खूपच वाईट वाटले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. असे असूनही माझ्याशी एकही शब्द न बोलता तुम्ही थेट दिल्लीला निघून गेले. पक्षाची कोअर कमिटी देशभर फिरेल. लोकांचे तसेच नेत्यांचे या युतीसंदर्भात काय मत आहे, हे जाणून घेतले जाईल, असे तुम्ही सांगितले होते. मात्र कोअर कमिटीचा हा दौरा सुरू होण्याआधीच तुम्ही दिल्लीला जाऊन भाजपाच्या नेत्यांची भेट घेतली,” असे इब्राहिम देवेगौडा यांना उद्देशून म्हणाले.

माजी मंत्री एमएन नाबी हेदेखील नाराज

याआधी जेडीएसमधील अन्य काही मुस्लीम नेत्यांनीही भाजपाशी युती केल्यानंतर नाराजी व्यक्त केलेली आहे. काही नेत्यांनी तर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचाही इशारा दिला आहे. २४ सप्टेंबर रोजी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री एमएन नाबी यांनी बंगळुरू येथे एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी ‘आम्ही बंगळुरूमध्ये आणखी एक बैठक घेऊ त्यानंतर आमचा निर्णय आम्ही जाहीर करू,’ असे सांगितले होते.

तर जेडीएसचे उपाध्यक्ष शफिउल्ला बेग यांनी या युतीनंतर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ‘फक्त अल्पसंख्याक नेतेच नव्हे तर धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचे पालन करणारे पक्षातील बरेच नेते या युतीवर नाराज आहेत,’ असे शफिउल्ला म्हणाले होते.

एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

इब्राहिम हे जेडीएस पक्षाचे मोठे नेते आहेत. एचडी देवेगौडा पंतप्रधान असताना ते केंद्रात नागरी उड्डाण मंत्री होते. २००८ साली त्यांनी जेडीएस पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पुढे एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विधान परिषदेच्या नेत्याची निवड करताना माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी जेडीएस पक्षात प्रवेश केला होता. जेडीएसमध्ये प्रवेश करताच त्यांच्याकडे कर्नाटकच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

काँग्रेसवर केली होती टीका

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना त्यांनी तेव्हा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर सडकून टीका केली होती. “आता मी हायकमांडची जेव्हा वाटेल तेव्हा भेट घेऊ शकतो. मी आता माझे नेते देवेगौडा किंवा कुमारस्वामी यांच्याशी कधीही चर्चा करू शकतो. आता माझ्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मला वाट पाहण्याची गरज नाही. तसेच एक भेटीसाठी मला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही,” असे तेव्हा इब्राहिम म्हणाले होते.

इब्राहिम नेमका काय निर्णय घेणार?

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून इब्राहिम हे पक्षात नाराज असल्याचे म्हटले जात होते. पक्षात माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, अशी त्यांची तक्रार होती. असे असताना आता ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? की अन्य मार्ग निवडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader