एकनाथ शिंदे यांची कारकीर्द भाजपने मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिलेले एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१४ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८०च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवन परिचय

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

शैक्षणिक पात्रता

गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आता ते एमए करत आहेत. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

राजकीय प्रवास

सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले.

महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत.गृहमंत्री, नगरविकास मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन आणि पर्यावरण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री, स्वच्छता मंत्री,मृद व जलसंधारण मंत्री, पर्यटन मंत्री, संसदीय कार्य मंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री.

विधिमंडळातील कामगिरी

सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलिस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलिस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, हे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून सप्रमाण दाखवून दिले.

विरोधी पक्षनेते पदी निवड

सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर या पदावर होते. परंतु, एवढ्या अल्पावधीतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच त्यांची झालेली दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. परिणामी सरकारला नुकसान भरपाई घोषित करावी लागली.

एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून पुण्याचा चेहरामोहरा बदलणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला आले. परंतु, १९९९ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेच्या राजकारणात एमएसआरडीसीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सन २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी एमएसआरडीसी जवळपास मृत्यूशय्येवर होती. तिच्या डोक्यावर साडे सहा हजार कोटींचे कर्ज होते आणि एकही प्रकल्प सुरू नव्हता. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू केले. एमएसआरडीसी हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास त्यांनी सन २०१४ मध्ये व्यक्त केला होता. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. एमएसआरडीसीने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अल्पावधीत केलेली प्रभावी अमलबजावणी बघून विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाला सुरुवातही झाली आहे. याखेरीज कोकणचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे, कोकण सागरी महामार्गाचा विस्तार, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग

नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे.प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे.

वांद्रे-वर्सोवा सी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल

मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग

ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे.

शीळ-कल्याण रुंदीकरण

शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होत असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे.

ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता

घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजनारस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावलेसंपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलरदोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलकडेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवलीस्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजनापरिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झालीहे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरूओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्धत्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या

आनंद दिघे यांच्या पश्चात…

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपली, असे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला सावरण्याचे काम केले. २००५ मध्ये ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शिवसेना केवळ एकसंध ठेवली असे नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत केली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. याखेरीज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journy of new cm of maharashtra eknath shinde print politics news pkd
First published on: 30-06-2022 at 17:47 IST