K Annamalai Resignation Plans BJP Put on Hold : तमिळनाडूमधील भाजपाचा लोकप्रिय चेहरा असलेले के. अन्नामलाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांच्या प्रस्तावित राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने काही कालावधी मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मंगळवारी अन्नामलाई यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल संतोष यांची भेट घेतली. दुपारनंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते. राज्यात भाजपाची पाळेमुळे रोवण्यात अन्नामलाई यांची मोलाची भूमिका आहे. त्यांनी अचानक राजीनाम्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाल्याचे सांगितले जाते.
भाजपाकडून मनधरणीचे प्रयत्न
बी. एल. संतोष हे अन्नामलाई यांचे मार्गदर्शक मानले जातात. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत अन्नामलाई यांनी पक्षाशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवत बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. भविष्यात गरज भासल्यास भाजपासोबत जुळवून काम करण्याचा पर्यायही त्यांनी खुला ठेवला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घडामोडींची माहिती असलेल्या भाजपाच्या एका नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अन्नामलाई हे दिल्ली विमानतळावरून चेन्नईला रवाना होण्यासाठी निघाले असतानाच त्यांना पुन्हा चर्चेसाठी परत बोलावण्यात आले. अन्नामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी भाजपा नेतृत्वाची इच्छा असल्याचे समजते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांना भाजपातच राहण्यासाठी राजी केले, तर कडक संघटनात्मक शिस्त पाळण्याच्या पक्षाच्या आजवरच्या कार्यपद्धतीचा विचार करता हा एक अत्यंत दुर्मिळ आणि वेगळा निर्णय ठरेल.
अन्नामलाई यांची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, सोमवारी दी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अन्नामलाई यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला असून त्यांचा दिल्ली दौरा हा फक्त पक्ष नेतृत्वाचे आभार मानण्यासाठी होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर दोन पर्याय ठेवले होते. त्यापैकी एक म्हणजे त्यांची तमिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात यावी आणि किमान पुढील सात वर्षे स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात यावेत. अन्यथा, त्यांना स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्यास मोकळीक द्यावी, अशी त्यांची भूमिका होती. अन्नामलाई हे राज्यात नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या पर्यायावरही गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रविड पक्षांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. एम. के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक आणि माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या अन्नाद्रमुकला दारुण पराभवाचा सामना करावा लागला, तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जोसेफ विजय पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले.
अन्नामलाई नवीन राजकीय पक्ष काढणार?
निवडणूक निकालानंतर काँग्रेससह काही लहान पक्षांनी पाठिंब्यावर जोसेफ विजय यांनी राज्यात सरकार स्थापन केले. सूत्रांच्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या राजकीय पटलावर एखाद्या राष्ट्रीय पक्षाला मोठी राजकीय जागा निर्माण करणे अद्यापही कठीण आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा नवीन प्रादेशिक पक्ष राज्यात एक सक्षम पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो, असा युक्तिवाद अन्नामलाई यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर केला. भाजपाशी असलेले संबंध कटुतेने संपवण्याची अन्नामलाई यांची मुळीच इच्छा नाही. पक्षासोबत परस्पर समन्वय राखत त्यांना फक्त एक प्रतिस्पर्धी पक्ष उभारायचा आहे, असे त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले. अन्नामलाई यांनी २०२१ ते २०२५ या कालावधीत राज्यात भाजपाची पाळेमुळे रोवण्यात मोलाची भूमिका बजावली. तमिळनाडूत आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भाजपासाठी अन्नामलाई यांचे नेतृत्व प्रभावी ठरल्याची कबुली पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
अन्नामलाई यांची नाराजी कशामुळे?
नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक भाजपाने अण्णाद्रमुकशी युती केली होती. त्यावरून अन्नामलाई हे प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात होते. निवडणुकीतील जागावाटप, उमेदवार निवडीबाबत मतभेद, तमिळनाडूमध्ये भाजपाने स्वतंत्रपणे संघटनेचा विस्तार करावा असा अण्णामलाई यांचा आग्रह, राज्यातील आगामी रणनीतीबाबत प्रदेश नेतृत्वाशी मतभेद अशा अनेक कारणांमुळे अन्नामलाई यांची नाराजी आणखीनच वाढत गेली. गेल्या काही वर्षांत भाजपचा स्वतंत्र जनाधार निर्माण करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे आघाडीच्या राजकारणापेक्षा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी असे अन्नामलाईंचे म्हणणे होते. त्याकडे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांचे पक्षातील नेत्यांबरोबरचे मतभेद वाढल्याचे सांगितले जाते. यादरम्यान भविष्यातील राजकीय निर्णयाबाबत भाजप नेतृत्व आणि अन्नामलाई यांच्यातील चर्चांना आता महत्त्व प्राप्त झाले असून, त्यातून कोणता मार्ग निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
