कोल्हापूर : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपच्या वाटेवर असलेले समरजितसिंह घाटगे यांनी हातात हात घालून कागल नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने त्या विरोधात लढाई करणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर तोकड्या शक्तीनिशी सामना करण्याची वेळ आली.
मंडलिक यांना पाठबळ देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कंबर कसली असताना आता त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शैलीनिशी प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे कागलचे समर एका अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा रंग धारण करू लागले आहे.
कागल नगरपालिकेची निवडणूक प्रत्येक वेळी एक धगधगते पर्व असते. याही वेळी हे वातावरण तापत चालले होते. त्याला अचानक अनपेक्षित वेगळे वळण लागले. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशारानुसार गेली दहा वर्षे एकमेकांचे पक्के वैरी असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू सहकार समूहाचे नेते समरजित घाटगे हे जिवलग मित्राप्रमाणे सस्मितमुखाने वाटचाल करू लागले आहेत. परिणामी कागल मधली निवडणूक अगदीच एकांगी, सपक बनली. नाही म्हणायला मुश्रीफ ,घाटगे यांच्या एकत्र येण्यावर माजी खासदार संजय मंडलिक यांनी टीकेचे तोफ डागली. त्याला मुश्रीफ यांनी तितक्याच तडफेने उत्तर दिले.
मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या मध्ये दहा वर्षानंतर पुन्हा एकदा शाब्दिक युद्धा रंगले असून ते कागल आणि मुरगुड नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात ठळकपणे पाहायला मिळत आहे. या दोन्ही नगरपालिकेमध्ये मंडलिक यांनी उभे केलेले उमेदवार म्हणजे त्यांच्या साखर कारखान्यातील कामगार आणि त्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप करून मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे. त्यावर मंडलिक यांनीही मुश्रीफ यांच्या चुकांवर बोट ठेवायला सुरुवात केली आहे.
मुश्रीफ व घाटगे हे दोन तगडे नेते एकत्र आल्याने कागलचे मैदान तुलनेने सोपे झाले असताना मंडलिक त्यात आव्हानाचा किती रंग भरणार हे लक्षवेधी ठरले आहे. अशातच मुश्रीफ यांनी म्हटल्याप्रमाणे मंडलिक यांचे उमेदवार मर्यादित वर्तुळातील असतील तर तेही कितपत तगडा सामना करणार हा प्रश्न उरतोच. मंडलिक यांची झालेली कोंडी लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर धावून आले आहेत. परंतु मुश्रीफ व घाटगे हे बलाढ्य, धनाढ्य नेते एकत्र असल्याने त्याच्याशी मुकाबला करणे हे मुदलातच सोपे नाही. हे लक्षात घेऊन आता कागलच्या समरांगणात सेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघी रसद पुरवण्याची तयारी केलेली आहे.
महिना अखेरीस शिंदे यांच्या सभेचे नियोजन कागल मध्ये करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे प्रचारात उतरले की कमकुवत असलेली बाजू सुद्धा विजयाच्या विजयामध्ये कशी रूपांतरित होते हे लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या निवडणूक वेळी जिल्ह्यात दिसून आले होते. निवडणुकी मधील हा हातकणंगले पॅटर्न कागल मध्ये यशस्वी करण्याची शिंदेशाही रणनीती दिसत आहे. शिंदेंचा हा प्रभाव नेमका कसा असणार याचे कुतूहल आहे. शिंदे कागल मध्ये उतरून ताकद पणाला लावणार याचा अंदाज आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घाटगे- मुश्रीफ यांना अधिक ताकतीने कागल मध्ये उतरवले जाईल. परिणामी सुस्त बनू पाहणारे कागलचे समर अधिकच तापत जाणार हे उघड आहे.
