कोल्हापूर : नेत्याच्या छत्रछायेतून बाहेर पडताना नेतृत्वाशीच संघर्ष करण्याच्या कागलच्या राजकीय विद्यापीठातील परंपरा आता प्रताप तथा भय्या माने यांच्या पुणे पदवीधर निवडणुकीतील बंडखोरीच्या निमित्ताने पुढे आली आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून फारकत घेऊन सावतसुभा मांडला आहे. मात्र, आधीच्या इतिहासातील दाखल्याप्रमाणे तो कठोरपणे पुढे सुरू राहणार की बंडाची तलवार यथावकाश म्यान केली जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे राजकारण गेली चार दशके धगधगते राहिले आहे. या तालुक्यातील राजकीय संघर्ष कायमपणे अत्यंत टोकदार राहिला आहे. इतका की प्रमुख राजकीय घराण्यातील संघर्षामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांशी रोटी – बेटी व्यवहारही करायला धजत नाहीत असे दाखले आहेत. किंबहुना यामुळेच कागलला राजकीय विद्यापीठ अशी स्थानिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्याची उदाहरणे जितकी रंजक तितकीच संघर्षपूर्ण आहेत.

नेत्यासमोरच शड्डू

कागलच्या राजकारणात प्रामुख्याने ठसा उमटवला तो सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी. अनेकदा विधानसभा, लोकसभा निवडणुका जिंकणारे मंडलिक यांनी राज्यात मंत्रीपद भूषवले होते. प्रारंभी त्यांनी विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या समवेत राजकारण केले. स्वतःची प्रतिमा निर्माण करताना त्यांच्याशी संघर्ष केला. पुढे, घाटगे यांच्या नेतृत्वाचा हात सोडून हसन मुश्रीफ हे मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले.

नंतरच्या काळात मंडलिक – मुश्रीफ यांच्यात संघर्ष सुरू झाला. तो इतका विकोपाला गेला की कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातील सर्वात धगधगते प्रकरण म्हणून त्याची नोंद झाली. दोघांनी एकमेकांना शह – काटशह देण्याचे अनेक मार्ग चोखाळले. अलीकडच्या काळामध्ये सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी तालुक्यावर आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडलेल्या समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांना चुरशीची लढत दिली. अलीकडे या दोघांचे राजकीय सूत जुळले आहे. तथापि, दोघांनी आपापले प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरू केली आहेत.

मुश्रीफ – माने संघर्ष

एकूणच, कागलच्या राजकारणाचे फासे मुश्रीफ पथ्यावर पडणारे दिसत होते. परंतु, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीने घोळ निर्माण केला आहे. कागलच्या राजकारणात मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रताप माने यांची उमेदवारी हा नव्या वादाचा विषय ठरला आहे. गेली वर्ष दोन वर्ष मुश्रीफ हे स्वतःच माने ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे सातत्याने सांगत होते. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानंतर मुश्रीफ यांनी नमती भूमिका घेतली आहे. माने यांना निवडणुकीपासून लढवण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांनी केला. माने आता थांबायला तयार नाहीत. परिणामी दोघांनीही एकमेकांशी संबंध संपले अशी निर्वाणीचा भाषा चालवलेली आहे. यामुळे कागलच्या राजकारणात पुन्हा एकदा नेत्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा अध्याय नव्याने सुरू झाला आहे.

ठिणगी की स्वगृही?

स्वबळ आजमावू पाहणारे माने हे कितपत मुश्रीफ यांच्याशी संघर्ष करणार हा प्रश्न आहे. वादाची ठिणगी कितपत वाढणार याचे कुतुहल निर्माण झाले आहे. कागल पालिकेमध्ये मुश्रीफ – घाटगे यांचा सत्ताप्रभाव आहे. या पालिकेत माने यांच्या पत्नी सविता माने या नगराध्यक्ष आहेत. यामुळे आमदारकी मिळवण्याच्या प्रयत्नात पालिकेच्या अर्थपूर्ण राजकारणापासून बाजूला जाण्याचे धैर्य माने दाखवणार का, हा प्रश्न आहे. निवडणुकीचे वारे थंडावले की पुन्हा माने हे ‘परत फिरा’चे धोरण स्वीकारणार का, की मुश्रीफ यांच्याकडूनच त्यांना तशी साद घातली जाणार अशी आतापासूनच मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रताप माने यांचे हे बंड खरे आहे की मुश्रीफ – माने यांनी ठरवून चालवलेली नुरा कुस्ती आहे, अशी कुजबुज सुरू झाली आहे.