तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या मुलाने ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसच्या इतर नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. काकोली घोष दस्तीदार यांचे पुत्र बैद्यनाथ घोष हे विधानसभा निवडणुकीत बारासात येथून लढण्यास उत्सुक होते. मुलाला तिकिट मिळावे म्हणून काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षनेतृत्वासमोर अश्रू ढाळले. बैद्यनाथ यांना तिकिट नाकारण्यात आल्यानंतर काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभेच्या खासदारांसह बंडखोरी केली, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. याच आरोपांचे खंडण करत बैद्यनाथ यांनी ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

बैद्यनाथ व काकोली घोष दस्तीदार यांच्यावर आरोप काय?

बैद्यनाथ घोष दस्तीदार हे व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासह महुआ मोईत्रा, कल्याण बॅनर्जी, सौगत रॉय आणि सोनाली गुहा या नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. रविवारी सकाळी बैद्यनाथ म्हणाले, माझी आई काकोली घोष दस्तीदार ही मला विधानसभेचे तिकिट मिळावे म्हणून रडत होती, असा महुआ मोईत्रा यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. “१०० टक्के खोटे, तुमच्यातील मतभेदांवर तुम्ही राजकीय दृष्ट्या लढले पाहिजे. कुटुंबातील सदस्यांना किंवा एखाद्या खासगी व्यक्तीला वादात ओढण्याचे काही कारण नाही. मी माझ्या कायदेशीर हक्काचा आता वापर करणार आहे”, असे बैद्यनाथ एका पोस्टमध्ये म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेच्या खासदार काकोली घोष दस्तीदार ह्या तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर लोकसभा खासदारांचे नेतृत्व करत आहेत.

बैद्यनाथ घोष दस्तीदार यांच्या नोटीशीत काय?

आपल्याबाबत खोटे आरोप, बदनामी आणि चुकीचे संदर्भ देणे थांबवावे म्हणून बैद्यनाथ यांनी ‘सीज अँड डेसिस्ट’ (थांबवा आणि मनाई करा सूचना) नोटीस पाठवली आहे. एखाद्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी ही नोटीस पाठवली जाते. या नोटीशीत आपण एक उच्चशिक्षित असून लंडन तसेच अमेरिकेतील काही मोठ्या विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे, असे बैद्यनाथ यांनी सांगितले. आपल्यासाठी काकोली घोष यांनी विधानसभेचे तिकिट मागितले होते, परंतु ते न दिल्यामुळे काकोली घोष यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये बंड केले, असा आरोप आपल्यावर केला जातोय, असेही बैद्यनाथ यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.

‘आयपॅक’ने माझ्याशी संपर्क साधला – बैद्यनाथ घोष दस्तीदार

तृणमूल काँग्रेसची पॉलिटिकल फर्म असलेल्या ‘आयपॅक’ने आपल्याशी संपर्क साधला होता. विधानसभा निवडणूक बारासात मधून लढवावी अशी विनंती आपल्याला केली होती, असे बैद्यनाथ घोष दस्तीदार यांनी म्हटले आहे. बैद्यनाथ घोष दस्तीदार यांनी नोटीशीत म्हटले आहे, आपल्यावर आरोप केलेल्यांची नावे नोटीशीत नमूद आहेत. त्यांनी त्यांचे आरोप मागे घ्यावेत. तसेच ही नोटीस मिळाल्यापासून पुढच्या पंधरा दिवसांत स्पष्टीकरण देऊन माझी जाहीर माफी मागावी. जर नोटीसीत नमूद टीएमसी नेत्यांनी माझी माफी मागितली नाही, तर मी त्यांच्यावर फौजदारी, दिवाणी कारवाई करेन. दरम्यान, ममता बॅनर्जी व इतरांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.