scorecardresearch

वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?

कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे.

वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?
कालिचरण महाराज- संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

प्रबोध देशपांडे

अकोला : सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ९५ दिवस गजाआड देखील रहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपली नाही. अमरावती येथे शौर्य यात्रेत कालीचरण महाराजाने चिथावणीखोर विधान केले. ‘देवी देवता हिंसक होते, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात गैर काहीच नाही’, असे तरे या महाराजांनी तोडले आहेत.

कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले. कालीचरण महाराजचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. एका सर्वसामान्य कुटुंबातील कालीचरण आहेत. त्यांचे वडील धनंजय सराग यांचे औषधांचे दुकान आहे. कालीचरणचा लहानपणापासून अध्यात्माकडे अधिक ओढा होता. कालीचरण महाराजाने जिल्हा परिषद शाळेत अत्यल्प आठवीपर्यंत शिक्षण घेतले.

हेही वाचा: नितीन कुंभलकर : उत्तम नियोजनकार

अभ्यासात फारसा रस नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना इंदोर येथे मावशीकडे पाठवले होते. याठिकाणी ते आश्रमात जात होते. काही वर्षांनंतर कालीचरण पुन्हा अकोल्यात परतले. पुढे कालीचरण महाराज म्हणून ओळख निर्माण केली. कालीचरण कालिका माताची आराधना करतात. ते शिवभक्त आहेत. तरुणांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत. मध्यप्रदेशातील एका शिवमंदिरात कालीचरण महाराजाने ‘शिवतांडव स्त्रोत’ अतिशय पहाडी आवाजात सुरेल पद्धतीने म्हटले होते. याची चित्रफित समाज माध्यमातून प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. कालीचरण महाराजाच्या लोकप्रियतेत देशभर प्रचंड प्रमाणात वाढ झाली.

हेही वाचा: Maharashtra Assembly Session: अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार? शिंदे गटाकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले “आरोप झालेल्या मंत्र्यांनी…”

रायपूर येथील धर्मसंसदेसाठी डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना निमंत्रित केले. त्या ठिकाणी कालीचरण महाराजाने महात्मा गांधींसंदर्भात अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केले. भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवले. महात्मा गांधींचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना वंदन करतो, असे वक्तव्य कालीचरण महाराजाने केले. या प्रकरणात रायपूरसह देशात विविध ठिकाणी कालीचरण महाराजावर गुन्हे दाखल झाले.

वादग्रस्त विधानाची मालिका

मे २०२२ मध्ये त्यांनी अलिगढ येथे भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत. भारत पाकिस्तान युद्ध झाले तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील, असे आक्षेपार्ह मत मांडले. १५ डिसेंबरला अहमदनगर येथे लव जिहाद प्रकरणावर भाष्य केले. ‘लव जिहादासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा डोकं ठिकाणावर येईल,’ असं विचित्र व तथ्यहिन वक्तव्य केले.

हेही वाचा: बसपा आणि काँग्रेस २०२४ साली एकत्र येणार?, ‘भारत जोडो’ यात्रेत उत्तरप्रदेशचे खासदार सहभागी झाल्याने चर्चांना उधाण

नरेंद्र मोदींचे समर्थक, महापालिकेत दारुण पराभव

देशात विकास पाहिजे आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे. अनेकजण हिंदू धर्मासाठी काम करणं सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करीत आहेत, असे कालीचरण महाराजाचे मत आहे. कालीचरण महाराज अकोला महापालिकेच्या २०१७ च्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले होते. मात्र, त्यांना दारुण पराभव झाला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 10:49 IST

संबंधित बातम्या