राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारणात अपवाद ठरेल अशी घटना आठवडाभरापुर्वी कल्याण डोंबिवलीत घडली. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज्यातील एकाही शहरात स्वबळावर सत्तेत नाही. मुंबई, नाशिक यासारख्या एकेकाळी बऱ्यापैकी ताकद असलेल्या शहरांमध्येही मनसे सध्या अस्तित्व राखण्यासाठी झुंजत आहे. असे एकंदर चित्र असताना महापालिका निवडणुकांपुर्वी भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एका मोठया गटाने मनसेत घरवापसी केली.

डोंबिवली शहर हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण बालेकिल्ला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता ही डोंबिवलीतील भाजपची ठसठशीत अशी ओळख. असे असताना राज्यात, देशात कुठेही सत्तेत नसलेला ‘मनसे’सारखा पक्ष भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच आवाज देतो आणि अडीच वर्षानंतर आपलाच आमदार निवडून येणार असे टिपेच्या सुरात सांगतो यावरुन येथील राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन मित्रपक्षातील शितयुद्धाचीच चर्चा आता अधिक रंगू लागली आहे.

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिंदे आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता नवा राहीलेला नाही. ठाणे शहरात अजूनही शिंदे म्हणतील तीच पुर्वदिशा असा एकंदर कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असले तरी ठाण्यातील पोलीस, प्रशासकीय नियुक्त्यांवर अजूनही शिंदे यांचाच वरचष्मा दिसून येतो. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही महापालिका शिंदे आणि भाजप युतीत लढल्या. या निवडणुका स्वतंत्र्यपणे लढवाव्यात असा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. शिंदेनी मात्र दिल्लीत जाऊन आपल्याला हवा तसा निर्णय करुन घेतला. त्यामुळे इच्छा नसतानाही भाजपला या दोन शहरांमध्ये शिंदे यांच्या पक्षाबरोबर युती करावी लागली. या दोन्ही महापालिकांमध्ये शिंदे यांच्या पक्षाचा महापौर तसेच भाजपचा उपमहापौर आहे. वरवर पहाता या दोन्ही पक्षांना सत्तेत समान वाटा असल्याचे चित्र रंगविले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही.

ठाण्यातील शिंदेसेनेच्या कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी मध्यंतरी रणशिंग पुकारले. उपमहापौरांसह पक्षाचे नगरसेवक भर सभेत सभागृहात महापौरांविरोधात ठिय्या मारुन बसले. महापौर आणि शिवसेना मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या गेल्या. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे हेदेखील सभागृहाबाहेर आक्रमक दिसले. याच दरम्यान प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लगबगीने ठाण्यात पक्ष नगरसेवकांची एक बैठक घेतली. ‘ठाण्यात सबुरीने घेण्याचे आपल्याला सूचना आहेत’ असा स्पष्ट संदेश पक्षाच्या नगरसेवकांना देण्यात आला.

शिंदेसेनेच्या नाकीनऊ आणण्याचे बेत आखणाऱ्या या नगरसेवकांना सध्या तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. ठाण्यात शाखा प्रमुखालाही आठ-दहा कोंटींचा निधी मिळत आहे. आमच्या वाट्याला ५० लाख येत नाहीत अशा तक्रारी यापैकी काहींनी चव्हाणांकडे केल्या. पण चव्हाणांनी हु की चू केले नाही असा अनुभव नगरसेवक दबक्या आवाजात सांगतात. ठाणे शिंदेना ‘ॲाप्शन’ला सोडलय असेच आता येथील भाजपाईंचे मत बनलय. ठाण्याची एक तऱ्हा तर डोंबिवलीत आता मनसेला पुढे करुन चव्हाणांची नाकेबंदी केली जाते आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर चव्हाणांनी अंबरनाथ, बदलापूरात तिरक्या चाली केल्या. तेव्हापासून आम्ही सावध झालोय, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेच्या एका मोठया नेत्याने दिली. अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेसाठी चव्हाणांनी काॅग्रेसचे नगरसेवक लावले. उल्हासनगरातही त्यांची हीच योजना होती.

अंबरनाथमध्ये चव्हाणांनी जे केले ते कल्याण डोंबिवलीत करणारच नाहीत याची खात्री देता येईल का, असा सवाल शिंदेसेनेचे स्थानिक नेते करताना दिसतात. या सगळ्या राजकारणात पार खोलात गेलेल्या मनसेला मात्र चांगले दिवस आलेत.

मनसेचे पाटील यांना शिंदेचे बळ ?

कल्याण लोकसभा क्षेत्रातील राजकारणात शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत आणि रविंद्र चव्हाण यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु असल्याचे चित्र आहे. महापालिकेत सत्तास्थापनेनंतर काही काळ या दोन पक्षात बरे सुरु आहे असे वातावरण होते. दीड-दोन महिन्यांपासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन शिंदे-चव्हाणांमध्ये पुन्हा बिनसले आहे. यावेळी शिंदेनी चव्हाणांवर थेट प्रहार करणे मात्र टाळले आहे. आपला पक्ष भाजपला अडचणीत आणतोय असे चित्र निर्माण होणे शिंदेसाठीही फारसे सोयीचे नाही. त्यामुळे मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या बोलंदाजीची जोरदार चर्चा सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करते झालेले काही जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा मनसेत आले. या कार्यक्रमात राजू पाटील यांनी चव्हाणांना थेट लक्ष्य केले. ‘चव्हाण इतके वर्ष डोंबिवलीचे आमदार, मंत्री राहीले. शहरासाठी तुम्ही काय दिवे लावले’ अशा शब्दात पाटील चव्हाणांवर घसरले. ‘अडीच वर्ष थांबा. मी आमदार होणार हे पक्के झालय’ अशी घोषणाही पाटील यांनी केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कल्याण ग्रामीण या पाटील यांच्या जुन्या विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदेसेनेचे राजेश मोरे हे आमदार आहेत. महापालिका निवडणुकानंतर मनसेच्या नगरसेवकांनी महापालिकेत शिंदेसेनेला साथ देत सत्तेच्या गणितात भाजपचा प्रभाव कसा कमी राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. कल्याण ग्रामीण, डोंबिवली तसेच आसपासच्या मतदारसंघातील कोणताही प्रश्न, शासकीय बैठका यामध्ये राजू पाटील यांना स्थान दिले जात आहे. मध्यंतरी शीळ-कल्याण रस्त्याच्या बांधणीत अडथळा ठरत असलेल्या शेतकऱ्यांच्या पुर्नवसानाच्या प्रश्नावर ‘एमएमआरडीए’मध्ये महत्वाची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या बैठकीत पाटील यांना पहिल्या रांगेत स्थान दिले गेले. विशेष म्हणजे, चव्हाण आणि भाजपचा एकही स्थानिक नेता या बैठकीकडे फिरकला देखील नाही.

कल्याण डोंबिवलीत महापालिकेतील प्रशासकीय व्यवस्था, याच भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर शिंदे यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ‘योग्य वेळ येऊ द्या, प्रत्येकाला आपली जागा कळेल’ असा दटावणीचा सुर भाजपचे नेते खासगीत व्यक्त करतात. आता सगळ सहन कराव लागतय हेदेखील मान्य करतात. या घडामोडींमुळे मरगळलेल्या मनसेला मात्र अचानक जोर आलाय. नगरसेवकांना निधी मिळू लागलाय, राजू पाटलांचे राजकीय ‘वजन’ वाढलय. कल्याण ग्रामीणमध्ये आमदार शिंदेचा असला तरी निर्णयप्रक्रियेत पाटीलांना मानाचे ताट वाढले जाते आहे. मानाच्या ताटावर बसणारे पाटील मात्र मिळेल तेथे भाजप आणि चव्हाणांचा पाणउतारा करताना दिसतात. मनसेला बळ आणि भाजपला शह ही शिंदे पिता-पुत्रांची खेळीने महायुतीचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत.