शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतर आमदारांना सोबत घेऊन बंडाचा झेंडा उगारल्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर संकट ओढावले आहे. या परिस्थितीत राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पक्षाच्या वरिष्ठ नेते कमलनाथ यांची नियुक्ती केली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे राज्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचा भाग आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता सोनिया गांधी यांनी तातडीने कमलनाथ यांची नियुक्ती केली आहे. एआयसीसीचे महासचिव के. सी वेणूगोपाल यांनी कमलनाथ यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली आहे. ज्येष्ठ संसदपटू आणि माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ हे पक्षाचे प्रमुख ट्रबल-शूटर म्हणून ओळखले जातात.




विविध संकटांना यशस्वीपणे तोंड देण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच ते पक्षात संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. विशेषत: नोव्हेंबर २०२० मध्ये पक्षाचे प्रमुख सल्लागार अहमद पटेल यांच्या निधनानंतर कामलनाथ यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. शरद पवार आणि इतर नेत्यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन करण्यात कमलनाथ यांची भूमिका महत्वाची होती.
काँग्रेसमधील सुत्रांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हातमिळवणी करावी हे पटवून देण्याची भूमिका कमलनाथ यांनी पार पाडली होती. अहमद पटेल यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणारे कमलनाथ हे पक्षातील एकमेव जेष्ठ नेते आहेत असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीसमोर निर्माण झालेल्या संकटालक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत सामोरे जाण्याची क्षमता असणारे नेते म्हणून कमलनाथ यांच्याकडे पाहिलं जात आहे.
नोव्हेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सात महिन्यांपूर्वी एमपीसीसी मध्यप्रदेश प्रमुख म्हणून कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त झाल्यानंतर कमलनाथ यांनी राज्यात पक्षाला विजय मिळवून दिला आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आणि मार्च २०२० पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्याच पक्षातील तत्कालीन प्रतिस्पर्धी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस आमदारांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कामलनाथ यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.