आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला… ठाण्यात शिंदेसेनेने आयोजित केलेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमाकडे भाजपा नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातच सक्रिय राहणार, या चर्चेवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली… राज्यातील प्रशासनाची देशभरात चांगली प्रतिमा असून, हीच महाराष्ट्राची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने आपला दौरा रद्द करत २९ ऑगस्टच्या आंदोलनाचे ठिकाण बदलण्याचीही तयारी सुरू केली… या सर्व बातम्या सविस्तर जाणून घेऊ…
“ठाकरेंची शिवसेना हाच खरा राजकीय पक्ष”
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. आज सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाची भूमिका आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मांडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच निष्कर्ष काढून ठेवला होता आणि त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी घ्यायला हवा होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष कुणाचा याचा निर्णय देणे अपेक्षित होते; पण शिवसेनेच्या प्रकरणात ही प्रक्रिया उलटी झाल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्षाची ओळख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ३९ आमदार शिंदे गटाकडे होते म्हणून तोच मूळ शिवसेना पक्ष ठरू शकत नाही. या संबंधित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय चुकीचा होता, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा युक्तिवादही सिब्बल यांनी केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
भाजपा-शिंदेसेनेत पुन्हा वादाची ठिगणी?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे शहरात आयोजित केलेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमाकडे भाजपाच्या नेत्यांनी निमंत्रण असूनही पाठ फिरवली. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील या दोन मित्रपक्षांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रण होते. त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले. त्याशिवाय भाजपाचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेत असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमांतून दोन्ही पक्षातील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे. यादरम्यान भाजपाच्या या भूमिकेवर शिंदेसेनेच्या नेत्यांनी खासगीत नाराजी बोलून दाखवली आहे.
फडणवीस दिल्लीत की महाराष्ट्रातच जाणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातील राजकारणातच सक्रिय राहणार, या चर्चेवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच सूचक प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी देऊन महाराष्ट्रात भाजपाच्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्याबाबत वारंवार विधाने करताना दिसून येत आहेत. या सर्व चर्चांवर नागपूर येथील एका कार्यक्रमात प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळण्यापेक्षा दुसरी मोठी जबाबदारी राहूच शकत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची सर्वाधिक गरज ही महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचेच नेतृत्व हवे, असेही अमृता यांनी स्पष्ट केले आहे.
“प्रशासन हीच महाराष्ट्राची खरी ताकद”
राज्यातील प्रशासनाची देशभरात चांगली प्रतिमा असून, हीच महाराष्ट्राची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या हस्ते आज पुण्यात माजी सनदी अधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या ‘आठवणींची ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, सुमित मलिक, नितीन करीर, यशदाचे महासंचालक सुहास दिवसे आणि शिवाजीराव देशमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, राजकीय नेतृत्वाकडे प्रत्येक विषयाचे संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवावा. प्रशासनाचा अनुभव आणि ज्ञान लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरले पाहिजे. राज्यातील प्रशासनाची देशभरात चांगली प्रतिमा असून, हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांचा दौरा तातडीने रद्द
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला मराठवाडा दौरा तातडीने रद्द केला. तसेच, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचे ठिकाण बदलण्याचीही तयारीही त्यांनी सुरू केली. तीन दिवसांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा यशस्वी करून आल्यानंतर जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी अंतरवालीमध्ये मराठा समन्वयक, अभ्यासकांशी चर्चा केली. दरम्यान, जरांगे हे मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचा नियोजित मराठवाडा दौरा रद्द करण्यात आला असून विदर्भाच्या दौऱ्यासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. यादरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आंदोलन अंतरवालीत नको, मुंबईतच हवे, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे अंतरवालीऐवजी मुंबईतील आंदोलनाचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता स्वत: जरांगे यांनीही बोलून दाखवली आहे. सध्या ते मुंबईतील आंदोलनाची चाचपणी करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तसे झाल्यास राज्य सरकार त्यांना आंदोलनाची परवानगी देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
