Haribhau Bagade in Phulambri Assembly Constituency : फुलंब्रीचे भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली, त्यामुळे भाजपला फुलंब्रीमध्ये उमेदवार शोधणे अपरिहार्य बनले आहे. तशीच अपरिहार्यता काँग्रेसची आहे. फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे यांच्या राजकारणाला आव्हान देणारे आमदार कल्याण काळे हे जालना लोकसभेतून निवडून आले. त्यामुळे त्यांचेही मनोबल वाढले आहे. काँग्रेसकडून उमेदवारांच्या शोधात कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे यांचे नाव आघाडीवर आहे. तर भाजपमधून राधाकिशन पठाडे, अनुराधा चव्हाण, रामुकाका शेळके यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मात्र, उमेदवारी देताना भाजपमध्ये हरिभाऊ बागडे यांचा शब्द भाजपमध्ये अंतिम असेल, असा दावा केला जातो.
फुलंब्री हा मतदारसंघ हरिभाऊ बागडे यांनी बांधलेला. गावागावातील लघू पाटबंधारे तलावापासून ते कोणत्या गावात कोणता कार्यकर्ता चांगले काम करतो आहे, याचे बागडे यांच्याकडे कमालीचे तपशील आहेत. कच्चे दुवे कोणते हेही त्यांना माहीत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांना एक लाख सहा हजार १०९ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कल्याण काळे यांनी ९० हजार ९१६ मते घेतली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून लढत असलेल्या काळे यांना फुलंब्री विधानसभा क्षेत्रातून २९,८५६ मताधिक्य मिळाले. त्यामुळे हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला मोठे आव्हान उभे करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. कल्याण काळे यांना फुलंब्रीतून आघाडी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जगन्नाथ काळे यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्याबरोबरीने विलास औताडे यांचा मुलगा विश्वास यांचे नावही जाहिरातीमधून पुढे आणले जात आहे.
भाजपमध्ये इच्छुक अनेक
विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत आपण उतरणार नाही, अशी घोषणा हरिभाऊ बागडे यांनी पूर्वीच केली होती. मात्र, तेव्हा त्यांचे हे मत कोणी गांभीर्याने घेतले नव्हते. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर अनुराधा चव्हाण सक्रिय झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चव्हाण यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस होते. २०१४ मध्ये त्यांना ३१ हजार ९५९ मते मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये बाजार समितीच्या राजकारणात सक्रिय असणारे राधाकिशन पठाडे यांचे नावही चर्चेत आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रामूकाका शेळके हेही भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
© The Indian Express (P) Ltd