कर्जत : सातारा जिल्हा परिषदेत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला. आता शिंदे यांच्या शिवसेनेने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या सत्तास्पर्धेत भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे नाट्यमय राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. विधान परिषदेचे सभापती, भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर मात करून त्यांच्याकडून कर्जत नगरपंचायतीची सत्ता हिसकावली खरी, मात्र ही सत्ता टिकवण्याचे आव्हान शिवसेनेने भाजप आणि पर्यायाने राम शिंदे यांच्यापुढे निर्माण केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या अविश्वास ठरावाच्या कायद्यात राज्यातील सरकारने बदल केला. या बदलाचा पहिला फायदा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मिळवून कर्जत नगरपंचायतीत सत्तांतर घडवले. आता याच कायद्याने त्यांच्यापुढे सत्ता टिकवण्याचेही आव्हान निर्माण झाले आहे. हे या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडीतील वेगळेपण आहे.
आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या १५ नगरसेवकांच्या माध्यमातून नगरपंचायतीची सत्ता मिळवली. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. मात्र, १५ पैकी तब्बल ११ नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राम शिंदे यांनी सत्तांतर घडवले. हे सत्तांतराचे समीकरण अवघ्या वर्षभरातच ढासळताना दिसत आहे.
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गाजावाजा करून भाजप प्रवेश करणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण घुले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला, तर त्यांची भावजय नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार देऊन राम शिंदे यांना चकवा दिला. या सर्वातून नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली आहे. ही समीकरणे आता राम शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना रोहित पवार यांनी सलग दोन वेळा राम शिंदे यांचा पराभव केला. या पराभवाची राजकीय भरपाई करण्यासाठी राम शिंदे यांनी नगरपंचायतीत सत्तांतर घडवले. एकूण १७ नगरसेवकांपैकी राम शिंदे यांच्याकडे आता १०, रोहित पवारांकडे ४, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ३ नगरसेवक आहेत. महिला नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी १२ मतांची आवश्यकता आहे. राम शिंदे यांच्याकडे तेवढे संख्याबळ आता राहिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन राम शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण केल्याचे मानले जाते. यातून राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
आगामी काळात राम शिंदे रोहित पवार यांची मदत घेणार का, असाही एक उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठा गाजावाजा करून केलेले सत्तांतर टिकविण्याचे आव्हान राम शिंदे यांच्यापुढे निर्माण झालेले आहे. राम शिंदे त्यावर कशी मात करतात, की शिवसेनेतच राहून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीने नगराध्यक्ष घुले पद अबाधित ठेवतात, याकडे लक्ष लागले आहे.
