कर्नाटकमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. याआधीच्या इतिहासाप्रमाणे यंदादेखील कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते असं राजकीय जाणकारांना वाटत आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि कांग्रेस या दोन्ही पक्षांचं जनता दल (सेक्युलर) या पक्षावर लक्ष आहे. राज्यातल्या अनेक विधानसभा मतदार संघांमध्ये जेडीएस हा पक्ष मजबूत स्थितीत आहे. त्यामुळेच दोन्ही पक्ष बहुमतासह सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएसला मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकमधल्या नागरिकांनी जेडीएसला मतदान करू नये असं आव्हान भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. २००४, २००८, २०१८ प्रमाणे २०२३ मध्ये देखील निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रीय पक्ष अशा मतदार संघांमध्ये रॅली काढत आहेत जिथे जेडीएस मजबूत स्थितीत आहे. जेडीएसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.

अमित शाह यांची बेळगावी येथे रॅली

या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी बेळगावी येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान त्यांनी कर्नाटकमध्ये पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. या क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी भाजपाला मतदान करावं असं आवाहन अमित शाह यांनी केलं.

जेडीएसला दिलेलं मत काँग्रेसलाच मिळणार : अमित शाह

अमित शाह म्हणाले की भाजपा हा राष्ट्रवादी पक्ष आहे. काँग्रेस आणि जेडीएसवर हल्लाबोल करत शाह म्हणाले की, “राज्यात एक पक्ष आहे ज्याला केवळ २५ ते ३० जागा जिंकायच्या आहेत. या जागा जिंकून हा पक्ष काँग्रेसच्या रथावर स्वार होऊन घराणेशाहीचं राजकारण करू पाहतोय. हा पक्ष म्हणजे जेडीएस. काँग्रेस आणि जेडीएस हे एकच आहेत. जेडीएसला दिलेलं मत हे काँग्रेसलाच मिळणार आहे.”

राज्यात काँग्रेसच विजयी होणार : सिद्धरामय्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मांड्या येथील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आगामी निवडणुकीत जेडीएसला मतदान करू नये. सिद्धरामय्या मतदारांना म्हणाले की, “तुम्ही मागील निवडणुकीत इथल्या सातपैकी एकाही मतदार संघात काँग्रेसला विजयी केलं नाही. सर्व जागा जेडीएसने जिंकल्या. यावेळी असं करू नका. तुम्ही पुन्हा असं करणार का? तुम्ही मांड्या येथील ७ पैकी किमान ५ ते ६ जागा काँग्रेसला द्यायला हव्यात.”

सिद्धरामय्या म्हणाले की, “काँग्रेसचं लवकरच सत्तेत पुनरागमन होईल. तुम्ही काँग्रेसला मतदान करून सत्तेत भागीदार बनलं पाहिजे. जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी म्हणतात की, ते १२३ जागा जिंकतील. काँग्रेस पक्ष सोबत असताना त्यांचा पक्ष केवळ ५८ जागा जिंकू शकला होता. त्यानंतर त्यांना केवळ २९ जागा मिळाल्या.”

हे ही वाचा >> अर्थसंकल्पातील ‘सप्तर्षी’वरून रोहित पवारांचा मोदी सरकारला खोचक टोला; म्हणाले, “अजित पवारांनी…”

जेडीएसचा काँग्रेसवर पलटवार

सिद्धरामय्या यांच्यावर पलटवार करत जेडीएसने म्हटलं आहे की, “काँग्रेस लोकांना सांगतंय की लोकांनी जेडीएसला मतदान करू नये, जेणेकरून जेडीएस पक्ष सत्तेबाहेर राहायला हवा. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी या पक्षाला सत्तेवर येऊ देणार नाही. त्यांचे नेते एकमेकांचं तोंडदेखील पाहात नाहीत. ज्यांचं स्वतःच्या पक्षावर नियंत्रण नाही ते लोक माझ्या पक्षापद्दल बोलत आहेत.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 bjp and congress eye on jds asc
First published on: 01-02-2023 at 16:42 IST