scorecardresearch

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक भाजपामध्ये खदखद; विजयेंद्र यांच्या नियुक्तीमुळे अनेक नेते नाराज!

गेल्या आठवड्यात भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नल, अरविंद बेल्लाड, माजी राज्यमंत्री सी. टी. रवी, अरवींद लिंबावली आदी भाजपाच्या नेत्यांनी बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेमणुकीवर नाराजी व्यक्त केली होती.

b s yediyurappa
बी एस येडियुरप्पा (संग्रहित फोटो)

कर्नाटकमध्ये विरोधी बाकावर असलेल्या भाजपा पक्षाने नुकतीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र आमदार बी. वाय. विजयेंद्र यांची, तसेच येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जाणारे आर. अशोक यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक केली आहे. मात्र, या नेमणुकांनंतर कर्नाटक भाजपामध्ये अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात भाजपा हा एका कुटुंबाचा पक्ष होऊ नये, अशी अपेक्षा आहे, असे मत येडियुरप्पा यांच्या विरोधातील नेत्यांनी मांडले आहे.

नाराज नेत्यांची दिल्लीच्या नेत्यांकडे तक्रार

गेल्या आठवड्यात भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नल, अरविंद बेल्लाड, माजी राज्यमंत्री सी. टी. रवी, अरवींद लिंबावली आदी भाजपाच्या नेत्यांनी बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेमणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. यत्नल हे नेहमीच येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्यावर टीका करतात. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत याबाबत केंद्रातील नेत्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले. “सध्या आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, असे दाखवणाऱ्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी केली होती. याबाबतची माहिती मी केंद्रातील नेत्यांना दिली आहे,” असे यत्नल यांनी सांगितले.

Uddhav Thackeray on Nanded toilet cleaning issue
डीनला संडास साफ करायला लावण्याच्या घटनेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “मस्तवाल, गद्दार खासदाराने…”
eknath shinde ajit pawar bjp leaders sattakaran
शिंदे-पवारांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांची पंचाईत
ajit pawar in baramati politics
अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी
B K Hariprasad
कर्नाटक : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, बड्या नेत्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका!

बी. एल. संतोष गट नाराज

कर्नाटक भाजपामध्ये येडियुरप्पासमर्थक आणि भाजपाचे सरचिटणीस बी. एल. संतोषसमर्थक असे दोन गट आहेत. संतोष यांच्या गटातील नेत्यांनी विजयेंद्र, तसेच आर. अशोक यांच्या नेमणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या बैठकीतून यत्नल, तसेच आमदार रमेश जारकीहोली हे बाहेर पडले होते. त्यानंतर यत्नल यांनी भाजपा हा एका कुटुंबाचा पक्ष होऊ नये. पक्षातील कार्यकर्त्यांना ते आवडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

बेल्लाड, लिंबावली यांनी व्यक्त केली नाराजी

यत्नल यांच्याप्रमाणेच बेल्लाड हेदेखील विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बेल्लाड यांनी आपली भूमिका मांडली होती. उत्तर कर्नाटकमधून पक्षाने विरोधी पक्षनेता निवडला, तर त्याचा भविष्यात पक्षाला फायदा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत आपले आणखी उमेदवार निवडून येऊ शकतात, असे ते म्हणाले होते. मात्र, शेवटी अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यत्नल व बेल्लाड हे दोन्ही नेते लिंगायत समाजातून येतात. उत्तर कर्नाटकात लिंगायत समाज बहुसंख्य आहे.

लिंबावली यांनीदेखील विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर गेल्या आठवड्यात प्रतिक्रिया दिली होती. विजयेंद्र यांच्यात येडियुरप्पा यांचे पुत्र असण्याशिवाय अन्य कोणते कौशल्य आहे, असे आम्हाला पक्षाचे कार्यकर्ते विचारत होते, असे लिंबावली म्हणाले.

… म्हणून विरोधकांना थेट बाजूला सारणे चुकीचे

दरम्यान, विजयेंद्र व अशोक यांच्या नियुक्त्यांमुळे येडियुरप्पा हे पुन्हा एकदा कर्नाटक भाजपाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे अन्य नेत्यांना बाजूला सारले जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे विजयेंद्र व येडियुरप्पा यांना थेट पक्षातूनच विरोध होत आहे. असा थेट विरोध होत असताना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विरोधकांना बाजूला सारणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे विजयेंद्र यांच्यासह पक्षातील अन्य नेते नाराजीबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत.

“वरिष्ठांशी बोलून तोडगा काढू”

विजयेंद्र यांच्याकडून भाजपाच्या अन्य नेत्यांकडून होत असलेला विरोध शमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यत्नल यांनी मांडलेल्या मतावर विजयेंद्र यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. यत्नल यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. यत्नल यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. म्हणूनच कदाचित त्यांनी त्यांचे आक्षेप सांगितले असतील. मात्र, वरिष्ठ, तसेच दिल्लीतील नेत्यांशी बोलून आम्ही यावर तोडगा काढू, असे विजयेंद्र म्हणाले. याच नाराजीबाबत भाजपाचे नेते नारायणस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली. “सध्या पक्षांतर्गत मतभेद असले तरी याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. विजयेंद्र हे पक्षातील प्रत्येकाला विश्वासात घेत आहेत,” असे नारायणस्वामी यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka bjp leaders upset over appointment of b y vijayendra as president and r ashoka as leader of opposition prd

First published on: 21-11-2023 at 11:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×