कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. सध्या येथे भाजपा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतोय. दरम्यान, कर्नाटकमध्ये प्रदेशाध्यक्षपद तसेच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी यावर भाजपामध्ये खल सुरू आहे. या दोन पदांसाठी नेत्यांची निवड करण्याकरिता भाजपाने दिल्लीवरून निरीक्षक पाठवले होते. हे निरीक्षक दिल्लीमध्ये परतले असून लवकरच भाजपा प्रदेशाध्यक्षपद तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड करण्यात आलेल्या नेत्यांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

लवकरच विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांच्या नावाची घोषणा

विरोधी पक्षनेता तसेच प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी दिल्लीवरून निरीक्षक म्हणून विनोद तावडे तसेच भाजपाचे सरचिटणीस एन रविकुमार कर्नाटकमध्ये गेले होते. त्यांनी भाजपाच्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करून या दोन पदांसाठी कोण नेते योग्य ठरतील, याची चाचपणी केली. कर्नाटकमधील आमदारांची मतं या निरीक्षकांनी नोंदवून घेतली असून लवकरच याबाबतचा अहवाल दिल्लीच्या नेतृत्वाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा कर्नाटकच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी तसेच कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांच्या नावांची घोषणा करणार आहेत. भाजपाचे आमदार रवीकुमार यांनी तशी माहिती दिली आहे.

कर्नाटकमध्ये १० मे रोजी निवडणूक पार पडली होती. काँग्रेसने तेथे सरकारची स्थापना केली आहे. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालेली आहे. मात्र भाजपाने अद्याप विरोधी पक्षनेत्याचे नाव घोषित केलेले नाही. कर्नाटकमधील गटबाजीमुळे भाजपाला हा निर्णय घेण्यास विलंब होत आहे.

विधिमंडळात गदारोळ, भाजपाचे आमदार आक्रमक

पावसाळी अधिवेशनात मंगळवारी (३ जुलै) भाजपाने सभागृहात चांगलाच गदारोळ केला. काँग्रेसने मतदारांना पाच महत्त्वाची आश्वासनं दिली होती. मात्र ही आश्वासने पूर्ण करण्यात काँग्रेसकडून विलंब केला जात आहे. या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात काँग्रेसला अपयश आले आहे, असा दावा करत भाजपाने सभागृहात घोषणाबाजी केली. हा गदारोळ थांबवण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादेर यांनी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेता विधानसभा अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी राज्यमंत्री आर. अशोक, सुनिल कुमार, सुरेश कुमार, बसनगौडा यत्नल अशा नेत्यांशी चर्चा केली. हे सर्वच नेते विरोधी पक्षनेतेपदासाठी उत्सुक आहेत.

भाजपाच्या गटात विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक नेते उत्सूक असले तरी माजी मुख्यमंत्री बोम्मई यांना अन्य नेत्यांची जास्त पसंती आहे. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचादेखील बोम्मई यांनाच पाठिंबा आहे. मात्र बोम्मई यांच्याकडे आमदारांचे पुरेसे पाठबळ नाही.

येडियुरप्पा, संतोष गटाकडून प्रयत्न सुरू

दरम्यान, दिल्ली हायकमांडला पक्षाची विचारधारा आणि केंद्रातील नेतृत्वाशी ताळमेळ राखू शकणाऱ्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद तसेच प्रदेशाध्यक्षपद द्यायचे आहे. येडियुरप्पा आणि भाजपाचे सरचिटणीस (संघटन) या दोन गटांकडून ही दोन्ही पदं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संतोष यांच्या गटातील अरविंद बेल्लाड यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी आमदारांना पाठिंबादेखील मागितलेला आहे. २०२१ साली येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार झाल्यानंतर बेल्लाड हे मुख्यमंत्रीपदाचा शर्यतीत होते.

भाजपा वोक्कालिगा, लिंगायत समाजाच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपवणार

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यासाठी भाजपाकडून लिंगायत आणि वोक्कालिगा समाजाच्या नेत्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपादी लिंगायत तर प्रदेशाध्यक्षपदासाठी वोक्कालिगा समाजाच्या नेत्याची निवड केली जाऊ सकते.