Siddaramaiah Resignation updates : मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सिद्धरामय्या मोकळा करतील. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्याचे प्रसंग कर्नाटकने मागील अनेक दशकांपासून अनुभवले आहेत. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल असा मुख्यमंत्री निवडणे हे कर्नाटकच्या जनतेसाठी कायमच आव्हानात्मक राहीले आहे. आघाड्या तुटणे, पक्षांतर, गटबाजी आणि दिल्लीचा हस्तक्षेप किंवा पक्षातील अंतर्गत कलह यांमुळे कर्नाटकात यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांना पाच वर्षांचा कालावधी संपण्याआधीच राजीनामा द्यावा लागला आहे.

कर्नाटकमध्ये आतापर्यंत फक्त तीनच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. सिद्धरामय्या हे त्यांपैकी एक आहेत. सिद्धरामय्या यांनी आज राजीनामा दिल्यास त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी आज मध्यातच संपुष्टात येईल. २०२३ मध्ये सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली होती. याआधी २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला होता.

एस. निजलिंगप्पा (१९६२ ते १९६८)

कर्नाटक राज्याला स्थिर सरकार देणारे एस. निजलिंगप्पा हे पहिले काँग्रेस नेते होते. निजलिंगप्पा यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कालावधी १९६२ ते १९६८ दरम्यान पूर्ण केला होता. त्यावेळी कर्नाटकला म्हैसूर या नावाने ओळखले जात होते. त्यांना कर्नाटकच्या आधुनिक राजकारणाचे जनक मानले जाते.

राज्यांची भाषिक पुनर्रचना झाल्यानंतर कर्नाटकमध्ये प्रशासकीय बळकटीकरण करण्याचे श्रेय निजलिंगप्पा यांना दिले जाते. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षातही महत्त्वाची भूमिका बजावली. १९६० च्या दशकात काँग्रेस पक्ष अत्यंत खडतर परिस्थितीतून जात असताना निजलिंगप्पा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. निजलिंगप्पा यांच्यानंतर पुढील दशकभरात एकाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही.

डी. देवराज अर्स (१९७२ ते १९७७)

कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे डी. देवराज अर्स हे दुसरे मुख्यमंत्री ठरले. कर्नाटकच्या राजकीय इतिहासात ते सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसमध्ये फूट पडली त्या काळात ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू मानले जात होते. अर्स यांनी कर्नाटकात सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणले. जमिनीशी संबंधित धोरण तसेच मागासवर्गीय समाज व समाजातील वंचित घटकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरण राबवले होते.

१९७२ ते १९७७ या कालावधीत डी. देवराज अर्स हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यांनी कर्नाटकच्या राजकारणातील जातीय समीकरण बदलले. मागासवर्गीयांना त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते. कर्नाटकात आज अनेक नेत्यांची अर्स यांच्याशी तुलना केली जाते. सिद्धरामय्या यांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणामुळे त्यांचीही अर्स यांच्याशी तुलना होते. कर्नाटकचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड अनेक दशकांपर्यंत अर्स यांच्या नावावर होता. सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्स यांचा हा रेकॉर्ड मागील वर्षी मोडला.

सिद्धरामय्या (२०१३ ते २०१८)

२०१३ ते २०१८ या कालावधीत मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरामय्या हे तिसरे मुख्यमंत्री ठरले. सिद्धरामय्या यांच्या आधी चार दशके कोणत्याही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. त्यामुळे ही राजकीयदृष्ट्या एक महत्वाची घटना ठरली होती. पक्षांची जुळवाजुळव करून स्थापन केलेले सरकार, भाजपाच्या काळात झालेले पक्षांतर, नेतृत्वबदल आणि अंतर्गत कलह यांमुळे कर्नाटकात एक स्थिर सरकार स्थापन होणे दुर्मिळ झाले होते.

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात सामाजिक हिताच्या योजनांवर भर दिला होता. त्यांनी गरीब व मागासवर्गीयांसाठी अन्न भाग्य आणि विविध योजना सुरू केल्या होत्या. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, गटबाजी होतीच. परंतु, त्यावर मात करत त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. सिद्धरामय्या हे देवराज अर्स यांच्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार?

२०२३ मध्ये कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत पेच निर्माण झाला होता. डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यात चुरस निर्माण झाली होती. सिद्धरामय्या हे पहिल्यांदा मुख्यमंत्री होतील, व त्यानंतर मुख्यमंत्री पद कालांतराने डी. के. शिवकुमार यांना दिले जाईल, असे समोर आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याबाबत काहीही बोलणी झाली नाही, असे काँग्रेसने अधिकृतपणे सांगितले होते.

सध्या येत असलेल्या वृत्तांनुसार, सिद्धरामय्या हे राजीनामा देऊन डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करणार आहेत. तसे झाल्यास सिद्धरामय्या यांना कर्नाटकात प्रस्थ असताना मुख्यमंत्री पद मध्येच सोडावे लागणार आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले कर्नाटकातील तिसरेच मुख्यमंत्री आहेत. डी.के. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्याबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद सोडण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.