Why Siddaramaiah Resigned : काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांच्या विशेष सचिवांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधींनी सांगितल्यास आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ, असे सिद्धरामय्या यांनी मागील सहा महिन्यांत सातत्याने म्हटले होते. अखेर सिद्धरामय्या यांनी काल (२८ मे) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धरामय्या हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.
सिद्धरामय्या यांनी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग त्यांनी मोकळा केला. डी. के. शिवकुमार हे त्यांच्या राजकीय कौशल्यासाठी आणि अडचणीच्या काळात धावून येणारे नेते म्हणून ओळखले जातात. राहुल गांधी आपल्याला राजीनामा द्यायला सांगणार नाहीत, असे सिद्धरामय्या यांना वाटत होते. परंतु, काँग्रेस नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाने सिद्धरामय्या यांना धक्का बसला होता, अशी माहिती सिद्धरामय्या यांच्या एका निकटवर्तीयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका २०२८ मध्ये होणार आहेत. तोपर्यंत सिद्धरामय्या यांचे वय ८० झालेले असेल. तसेच देशभरात भाजपाचा प्रभाव वाढत आहे. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे सिद्धरामय्या यांचा राजीनामा काँग्रेसने घेतला. भारताचा दक्षिणेकडील भाग वगळता भाजपाचे उत्तर, पूर्व व पश्चिम भारतावर वर्चस्व आहे. कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीचा विचार करून काँग्रेसने सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्याचे सांगितले. तसेच २०२३ मध्ये विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत कर्नाटक काँग्रेसमध्ये एक अलिखित करार झाल्याची चर्चा होती. त्यानुसार शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देऊन तो करार पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ होती, असे काँग्रेसमधील एका गटाला वाटते.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक काँग्रेसने डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात लढली होती. त्यावेळी २०२३ मध्ये व आजही डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्यापैकी मुख्यमंत्री पद कोणाला द्यावे, असा मोठा पेच काँग्रेस नेतृत्वासमोर त्यावेळी होता. राहुल गांधी यांचे समर्थन सिद्धरामय्या यांच्या नावाला होते. तर डी. के. शिवकुमार यांच्याबद्दल सोनिया गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांना सहानुभूती आहे. २०१९ मध्ये ईडीने डी. के. शिवकुमार यांना एका मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यांना तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी तिथे जाऊन शिवकुमार यांची भेट घेतली होती.
२०२३ मध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाबाबत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात जो समझोता झाला होता, त्याला दोन्ही नेते राजी नव्हते. मुख्यमंत्री पदाचा कालावधी जर वाटून घेतला जाणार असेल तर माझ्या मंत्रिमंडळात डी. के. शिवकुमार यांना स्थान देऊ नये, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली होती. तर दुसरीकडे माझ्या नेतृत्वात पक्षाला राज्यात सत्ता मिळाली आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर पक्षाने सांगितल्याप्रमाणे दोघांनीही पक्षाचा निर्णय मान्य केला होता. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री झाले.
सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने शिवकुमार यांच्या मागणीला गांभीर्याने घेतले होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे पक्षाकडून शिवकुमार यांना सांगण्यात आले होते. दरम्यान, यामुळे सिद्धरामय्या यांच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली. कर्नाटकचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम डी. देवराज अर्स यांच्या नावावर होता. ते सात वर्ष २३९ दिवस मुख्यमंत्री राहिले होते. सिद्धरामय्या यांनी अर्स यांचा हा विक्रम जानेवारी महिन्यात मोडला.
काँग्रेसला पुढील निवडणुकांचा विचार करता अलिखित कराराची पूर्तता करणे गरजेचे होते. एका ८० वर्षीय नेत्याच्या नेतृत्वात पक्ष निवडणुकांना सामोरे जाऊ शकतो का? असा सवाल काँग्रेसमधून सिद्धरामय्या यांच्या विरोधात उपस्थित केला जात होता. तसेच सिद्धरामय्या यांनी पुढील निवडणुका लढणार नसल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्याकडे मिळवण्यासारखे काहीच नाही, असे म्हणणारा एक गट कर्नाटक काँग्रेसमध्ये होता.
कर्नाटकातील सिद्धरामय्या विरूद्ध डी. के. शिवकुमार हा वाद काँग्रेस नेतृत्वाला सोडवणे महत्वाचे होते. सिद्धरामय्या हे मागासवर्गीय समाजातील नेते असून त्यांच्या मागे ‘अहिंदा’ मतपेढी आहे. राहुल गांधी यांच्या सामाजिक न्यायाच्या प्रयत्नांची पूर्तता सिद्धरामय्या यांच्या माध्यमातून होत होती. तर दुसरीकडे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद देऊन नेतृत्वबदल करावा, अशी आशा प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली होती. कर्नाटकात सत्ता मिळवण्यात शिवकुमार यांचे योगदान वखाणण्याजोगे आहे. त्यामुळे त्यांना कधीतरी त्यांच्या कामाचे बक्षीस मिळणे अपेक्षित होते. डी. के. शिवकुमार हे काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस कर्नाटकात पुन्हा सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.
कर्नाटकात होणार नेतृत्वबदल हा सन्मानपूर्वक व्हावा याची काँग्रेसने कटाक्षाने काळजी घेतली. सिद्धरामय्या यांना राज्यसभेचे सदस्यत्व तसेच राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली होती. तसेच सिद्धरामय्या यांच्याची एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना योग्य जबाबदाऱ्या दिल्या जातील. त्यांच्या मुलालाही योग्य पद दिले जाईल, अशी ग्वाही काँग्रेस नेतृत्वाने दिली. परंतु, सिद्धरामय्या यांनी कोणतीच ऑफर स्वीकारलेली नाही. त्यांनी तुर्तास पदावरून पायउतार होऊन नम्रपणे पक्षआदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
