विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार निवडीवरून सुरू झालेल्या वादाने कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. या वादाचे पडसाद थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विधान परिषदेचे सदस्य नझीर अहमद यांना तातडीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश सोमवारी देण्यात आले. पोटनिवडणुकीतील कथित बंडाळीमुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले जाते. नझीर अहमद यांच्याआधी तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले अब्दुल जब्बार यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेसमधील वादाचे कारण काय?

कर्नाटकमधील दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोटनिवडणूक घेण्यात आली. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते शामनूर शिवशंकरप्पा यांनी दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून तब्बल २८,००० मताधिक्क्याने विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसने समर्थ मल्लिकार्जुन यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपाने श्रीनिवास टी. दासकरियप्पा यांना रिंगणात उतरवले होते. दावणगेरे दक्षिण मतदारसंघात सुमारे ३५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. या समुदायातील मुस्लीम नेत्यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार समर्थ मल्लिकार्जुन यांच्या प्रचारापासून दुरावा ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याच कारणामुळे मुस्लीम नेत्यांची हकालपट्टी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

उमेदवाराच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये नाराजी

काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना नझीर अहमद म्हणाले की, ९ एप्रिल रोजीच केरळ विधानसभेसाठी मतदान असल्याने पक्षाने माझी तिथे स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती, त्यामुळे मला दावणगेरे दक्षिणकडे पूर्ण लक्ष देता आले नाही. ५ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन यांच्या प्रचारासाठी मी मतदारसंघात सभा घेतली होती. उमेदवार निवडीवरून असलेल्या नाराजीवर बोलताना ते म्हणाले की, यात लपवण्यासारखे काहीच नाही. रणदीप सुरजेवाला आणि डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मी मुस्लीम उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षाने मल्लिकार्जुन यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा निर्णय मी अंतिम मानला. या जागेसाठी सात मुस्लीम इच्छुकांनी अर्ज केले होते. मी तर इतकेही म्हटले होते की, जर मुस्लीम उमेदवाराचा पराभव झाला, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन.

आणखी वाचा : भाजपामुळे शिंदे गटात वाद उफाळला? महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

घराणेशाहीवरून काँग्रेसमध्ये टोकाचे वाद

दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने दिवंगत नेते शिवशंकरप्पा यांचे नातू समर्थ मल्लिकार्जुन यांना उमेदवारी दिली आहे. समर्थ यांचे वडील एस. एस. मल्लिकार्जुन हे विद्यमान सरकारमध्ये असून त्यांच्या आई प्रभा या दावणगेरेच्या खासदार आहेत. एकाच कुटुंबात सर्व पदे जात असल्यामुळे काही स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे, या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी बागलकोट पोटनिवडणुकीचे उदाहरण दिले. तिथेही काँग्रेसने माजी आमदार एच. वाय. मेटी यांचा मुलगा उमेश याला उमेदवारी दिली होती. काँग्रेस नेते सलीम अहमद म्हणाले की, जर एका मतदारसंघात एका कुटुंबाला तिकीट दिले जाऊ शकते, तर दावणगेरे दक्षिणमध्ये का नाही? शिवाय दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याची परंपराच आहे.

Congress MLC Naseer Ahmed and CM Siddaramaiah
विधान परिषदेचे सदस्य नझीर अहमद आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या (छायाचित्र फेसबुक)

उमेदवार निवडीला मुस्लीम नेत्यांचा विरोध

निवडणुकीपूर्वी मुस्लीम समुदायाने समर्थ मल्लिकार्जुन यांच्या उमेदवारीचा निषेध केला होता. काँग्रेस नेते सादिक पहेलवान यांनी तर बंडखोरी करत अर्ज दाखल केला. पक्षाने त्यांची समजूत काढून माघार घ्यायला लावली; पण तोपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ निघून गेल्याने त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले. ९ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीचे मतदान संपल्यानंतर हा वाद जाहीरपणे समोर आला. १० एप्रिल रोजी सलीम अहमद आणि आमदार रिझवान अर्शद यांनी पत्रकार परिषद घेऊन काही अल्पसंख्याक नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा थेट आरोप केला. अर्शद यांनी असेही सांगितले की, या गटाला अब्दुल जब्बार यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र, ते लोकप्रिय नसल्यामुळे पक्षाचा पराभव होण्याची शक्यता होती. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्षपद सोडताना अब्दुल जब्बार यांनी एक खरमरीत पत्र लिहिले. अल्पसंख्याक मतदार आणि पदाधिकारी हे काँग्रेस पक्षाचा कणा आहेत आणि या समुदायाला नक्कीच चांगली वागणूक मिळायला हवी. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे दुःखी होऊन आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.

हेही वाचा : ठाकरे गटाच्या प्रभावशाली नेत्या भाजपाच्या वाटेवर? फडणवीस सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार? वाचा ५ घडामोडी…

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

नझीर अहमद यांच्या हकालपट्टीवर बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, दावणगेरे दक्षिणचा उमेदवार सर्वांना विश्वासात घेऊनच ठरवण्यात आला होता. त्यानंतर हे सर्व प्रकार सुरू झाले. आम्ही संबंधित नेत्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर उमेदवार सादिक पहेलवान यांचा अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत नझीर अहमद यांनी दिरंगाई केली. नझीर अहमद यांना हेलिकॉप्टरने दावणगेरेला जाऊन पहेलवान यांचा अर्ज माघारी घेण्यास सांगितले होते. मात्र, ते बेंगळुरूच्या हेलिपॅडपर्यंत गेले आणि तिथूनच परतले. पक्षातील एका बड्या नेत्याने त्यांना तिथे न जाण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप काँग्रेसमधील एका पदाधिकाऱ्याने केला. नझीर अहमद यांनी स्वतःहून राजीनामा देण्यास टाळाटाळ केल्यामुळे सरकारने अखेर त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश काढले. आता या प्रकरणी एका मंत्र्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. दावणगेरेच्या या पोटनिवडणुकीने कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे जे दर्शन घडवले आहे, त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता आहे.