scorecardresearch

Karnataka Election : बेळगावमधील सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षात चुरस; सीमावाद मोठा प्रश्न

कर्नाटकातील बेळगाव हा सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला दुसरा जिल्हा आहे. भाजपा आणि काँग्रेसमधील आमदारांमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे कोणता पक्ष अधिक जागा मिळवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

belagavi assembly karnataka
बेळगावमध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षात चुरस पाहायला मिळते

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका (१० मे) महिन्याभरात होणार आहेत. भाजपा आपली सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस आणि जेडीएस पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. महाराष्ट्र सीमेलगत असलेला बेळगाव जिल्हा हा कर्नाटकच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. बंगळुरू शहरानंतर (२८ मतदारसंघ) बेळगावी हा सर्वाधिक १८ विधानसभा मतदारसंघ असलेला जिल्हा आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहता इथे काँग्रेस आणि भाजपाची थेट टक्कर असल्याचे दिसून येते. २०१९ च्या निवडणुकीत जेडीएसला बेळगावमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. त्यांचा एकही आमदार या जिल्ह्यात नाही.

ऊस पट्ट्या असलेल्या बेळगावमध्ये अनेक आमदारांकडे ऊस-साखरेशी संबंधित सहकारी संस्था आणि कारखाने आहेत. या संस्थांच्या माध्यमातून अनेक आमदारांनी आपले बस्तान मतदारसंघात बसवले आहे. जारकीहोळी कुटुंब हे बेळगावमधील एक प्रभावशाली राजकीय घराणे मानले जाते. या परिवारातून रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे दोन आमदार भाजपाच्या चिन्हावर निवडून येतात. तर सतीश जारकीहोळी हे काँग्रेसचे आमदार आहेत. विधानपरिषदेचे आमदार लखन जारकीहोळी हेदेखील काँग्रेस पक्षात आहेत. तसेच जोले कुटुंबियांचा देखील बेळगावमध्ये चांगला दबदबा आहे. मुझराई (धार्मिक आणि दानधर्म विभाग) विभागाच्या मंत्री शशिकला जोले निपाणीच्या आमदार आहेत. त्यांचे पती अण्णासाहेब जोले हे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दोघेही भाजपात आहेत.

हे वाचा >> Karnataka : बंगळुरूवर कोणाची पकड? आर्थिक राजधानीवर झेंडा रोवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-जेडीएसकडून शर्थीचे प्रयत्न

बेळगावमधील भाजपाच्या अनेक नेत्यांमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस भाजपासाठी काही मतदारसंघात डोकेदुखी ठरू शकते. भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार आणि माजी मंत्री लक्ष्मण सावदी आणि भाजपा आमदार रमेश जारकीहोळी यांचे संबंध चांगले नाहीत. रमेश जारकीहोळी यांनी भाजपात प्रवेश करण्याआधी जेडीएसमधून मंत्रीपद भोगले होते. जारकीहोळी यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत अथनी विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण सावदी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या महेश कुमठहळ्ळी यांना मदत केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये महेश कुमठहळ्ळी यांनी काँग्रेसचा राजीनामा देत अथनी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवला. अथनीमध्ये २०१८ साली झालेला पराभवाचा राग लक्ष्मण सावदी यांना आहे.

या दोन्ही नेत्यांमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आलेले असून दोघांच्याही विसंवादाचा फटका पक्षाला बसत आहे. त्यासोबतच रमेश जारकीहोळी यांचे काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत देखील वाद आहेत. काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तर रमेश जारकीहोळी पुढच्या निवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघातून निवडूनच येणार नाहीत, असे जाहीर केले आहे. गोकाक हा रमेश जारकीहोळी यांचा बालेकिल्ला मानला जातो.

हे वाचा >> बेळगावमध्ये मराठी मतांसाठी रस्सीखेच; राजहंसगडावरील छत्रपती शिवरायांच्या एकाच पुतळ्याचे दोनदा अनावरण

बेळगावमधील पाच मतदारसंघात मराठी मतदारांचे वर्चस्व आहे. तर १३ मतदारसंघात लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. त्यासोबतच ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती यांची देखील संख्या दखल घेण्याजोगी आहे. बेळगावमध्ये दोन मतदारसंघ आरक्षित गटासाठी राखीव आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १० जागांवर विजय मिळवळा होता. तर काँग्रेसचा आठ जागांवर विजय झाला होता. २०१९ साली काँग्रेस पक्षात फुट पडल्यामुळे काँग्रेसचे तीन आमदार रमेश जारकीहोळी (गोकाक), महेश कुमठहळ्ळी (अथनी) आणि श्रीमंत पाटील (कागवड) यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवला होता.

२०१८ प्रमाणेच २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजपाने ८ आणि काँग्रेसने ७ ठिकाणी विजय मिळवला होता. तर २००८ च्या निवडणुकीत भाजपा ९ आणि काँग्रेसने ७ जागा मिळवल्या होत्या. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांत पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्यामुळे बेळगावमधील अनेक मतदारसंघावर त्याचा परिणाम होईल का? हे पाहणे देखील औचित्याचे ठरेल. तर साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकविल्याचाही मुद्दा निवडणुकीत गाजू शकतो.

बेळगावमध्ये एकूण जागा १८

  • २०१८ – भाजपा १०, काँग्रेस ८, जेडीएस ०
  • २०१३ – भाजपा ८, काँग्रेस ७, जेडीएस ०, इतर – ३
  • २००८ – भाजपा ९, काँग्रेस ७, जेडीएस २

असा असेल २०२३ निवडणूक कार्यक्रम

  • नोटिफिकेशन – १३ एप्रिल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल
  • अर्ज छाननी – २१ एप्रिल
  • अर्ज माघारी घेण्याची मुदत – २४ एप्रिल
  • मतदानाची तारीख – १० मे
  • मतमोजणी आणि निकालाची तारीख – १३ मे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 13:14 IST

संबंधित बातम्या