BJP MLA Munirathna gang rape case : भाजपाच्या कार्यकर्तीने सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु येथील भाजपाचे विद्यमान आमदार मुनीरत्न नायडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर एसआयटीच्या विशेष पथकाने गुरुवारी (तारीख २३ मे) नायडू यांच्याशी संबंधित आणखी एका प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणामुळे भाजपा आमदाराचे पाय खोलात गेले असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोण आहेत मुनीरत्न नायडू? पीडित महिलेने त्यांच्यावर आणखी काय आरोप केले? याबाबत जाणून घेऊ…

मुनीरत्न नायडू यांची राजकीय कारकीर्द

मुनीरत्न नायडू हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. नायडू यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात उत्तर बंगळुरूच्या यशवंतपूर येथून केली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. राजराजेश्वरीनगर मतदारसंघाचे आमदार असलेले मुनीरत्न सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्ये होते. त्यांनी २०१३ व २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. सलग दोनवेळा निवडून आलेल्या नायडूंनी २०१९ मध्ये काँग्रेसशी बंडखोरी केली. आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नायडू हे भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले.

१५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप

२०२० मध्ये कर्नाटकात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर नायडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २०१८ मध्ये, गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ब्रुहट बेंगळुरू महानगरपालिका (बीबीएमपी) मधील बनावट बिल घोटाळ्याच्या संदर्भात आमदार नायडू यांची कसून चौकशी केली. हा घोटाळा २०१४ सालचा असून, राजराजेश्वरीनगर, मल्लेश्वरम आणि गांधी नगर या मतदारसंघांमध्ये अंदाजे १,५०० कोटी रुपयांच्या नागरी कामांच्या अंमलबजावणीशी संबंधित होता. काही प्रकरणांमध्ये एका कामाचे एकापेक्षा अधिकवेळा बील काढल्याचा आरोप त्यांच्यावर होता, तर काही ठिकाणी अशी बील सादर करण्यात आली होती की, ज्यांची कामे प्रत्यक्षात हातीही घेण्यात आलेली नव्हती. त्या काळात काँग्रेसचे आमदार असलेले मुनीरत्न हे या प्रकरणातील चार नंबरचे आरोपी होते, असे सीआयडीच्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले होते.

आणखी वाचा : BJP Crisis : भाजपामध्ये अंतर्गत कलह, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पुन्हा लांबणीवर? नेमकं कारण काय?

२०२३ मध्ये मुनीरत्न नायडूंवर गुन्हा

२०१८ मध्ये बंगुळरू येथील जालहल्ली येथील एका इमारतीतून सुमारे ९ हजार ८०० मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणातही आमदार नायडू यांचे नाव समोर आले. दोन वर्षांनंतर, कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले. ही कारवाई एका जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती, ज्यामध्ये चौकशीत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मार्च २०२३ मध्ये, ख्रिस्ती समुदायाविरोधात कथित द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी आमदार नायडू यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढच्याच महिन्यात त्यांना अटक करण्याची मागणी करणारे पत्र सोशल मीडियावर प्रसारित झाले. त्यावेळी नायडू हे भाजपा सरकारमध्ये फलोत्पादन मंत्री होते. यावरून सरकार आणि राज्य कंत्राटदार संघटनेत चांगलाच वाद झाला होता.

राजकीय प्रतिस्पर्ध्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं?

२०२३ च्या अखेरीस नायडू यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याच्या संदर्भात कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष डी. केम्पण्णा यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. केम्पण्णा यांनी थेट नाव न घेता, मंत्री अधिकाऱ्यांना धमकावत पैशाची वसुली करत असल्याचा आरोप केला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये, कर्नाटक सरकारने भाजपा आमदार मुनीरत्न यांच्याविरोधातील अनेक आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक केली, ज्यामध्ये नायडू यांनी २०२० ते २०२२ दरम्यान एका ४० वर्षीय महिलेवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाचा समावेश होता. या प्रकरणातील तक्रारदार महिलेने असा दावा केला की, आमदार नायडू यांनी तिचा वापर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना हनीट्रॅप करण्यासाठी केला होता. पीडितेला हाताशी धरून आमदार महोदयांनी एका माजी नगरसेवकाच्या पतीला HIV संसर्गित केले होते.

‘लिंगा’ चित्रपटाची केली होती निर्मिती

आमदार मुन्नीरत्न नायडू यांचे नाव बंगळुरूतील विविध शहरी प्रकल्पांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कंत्राटदारांशी जोडले गेले आहे. त्यांचे काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी आणि डी. के. शिवकुमार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. माजी मंत्री राहिलेले मुनीरत्न चित्रपट क्षेत्रातही सक्रीय होते. त्यांचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशीही घनिष्ठ संबंध आहेत. आमदार मुन्नीरत्न नायडू यांनी अभिनेता निखिल कुमारस्वामी यांच्या प्रमुख भूमिकेतील चित्रपटाची निर्मिती केली होती. सुपरस्टार रजनीकांत यांनी भूमिका साकारलेल्या ‘लिंगा’ चित्रपटाचेही त्यांनी निर्मिती केली आहे. १ जून २०१० मध्ये बंगळुरूमध्ये भिंत कोसळून एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता. ही भिंतही मुन्नीरत्न नायडू यांनीच बांधली होती, त्यावेळी ते कंत्राटदार होते.

हेही वाचा : India vs China War : भारत-चीन १९६२ च्या युद्धादरम्यान नेहरूंना विरोधकांनी कसं घेरलं होतं? त्यावेळी संसदेत काय घडलं?

महिला कार्यकर्तीने केला बलात्काराचा आरोप

आमदार मुनीरत्न नायडू आता नव्या अडचणीत सापडले आहेत. आपल्याच पक्षातील एका महिला कार्यकर्तीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये त्यांचे सहकारी वसंता, चन्नकेशव, कमल आणि एका अज्ञात व्यक्तीला या प्रकरणात सह-आरोपी करण्यात आले आहे. पीडितेने आरोप केला की २०१३ मध्ये, वैयक्तिक रागातून मुनीरत्न यांनी तिला वेशा व्यवसायाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले होते. तेथून सुटका झाल्यानंतर आमदाराने सहकाऱ्यांच्या मदतीने खूनाच्या गुन्ह्यात अडकवून तिला लक्ष्य केले, ज्यामुळे तिला पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. ज्यानंतर महिनाभरात तिला जामीन मिळाला आणि ती बाहेर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेच्या चेहऱ्यावर लघवीही केली

पीडितेने असाही दावा केला की, ११ जून २०२३ रोजी आमदार मुनीरत्न व त्यांचे सहकारी संध्याकाळी ७ वाजता तिच्या घरी आले. आमच्याबरोबर कार्यालयात आली तर तुझ्याविरोधातील प्रलंबित खटले मागे घेतले जातील, असे प्रलोभन त्यांनी पीडितेला दिले. कार्यालयात गेल्यानंतर आमदार मुनीरत्न व त्यांच्या सहकार्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी पीडितेच्या चेहऱ्यावर लघवीही केली. त्यानंतर तिला एका पदार्थाचे इंजेक्शन देण्यात आले. यामुळे पीडितेला त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. सध्या पीडित महिलेवर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.