Kerala Congress CM : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (UDF) बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढली आहे. केरळमध्ये निवडून आलेल्या आमदारांना मुख्यमंत्री पदी कोण हवंय? याचा आढावा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून घेतला जातोय.
मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची गुरूवारी बैठक पार पडली. त्या बैठकीत मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (यूडीएफ) केरळ विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले. केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांपैकी यूडीएफला १०२ जागा मिळाल्या. त्यापैकी ६३ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. केरळचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे या तिघांमधून मुख्यमंत्री निवडण्याचे काँग्रेस नेतृत्वासमोर आव्हान आहे.
मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस आमदारांशी वैयक्तिक चर्चा
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पर्यवेक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकण हे काँग्रेस आमदारांची वैयक्तिक भेट घेत आहे. मुख्यमंत्री पदासाठी आमदारांच्या मनात कोण आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तीन नेत्यांच्या समर्थकांनी देखील पर्यवेक्षकांची भेट घेत आपल्या मनातील नेत्याचे नाव सुचवले आहे. दरम्यान, केरळमधील दिग्गज व वरिष्ठ तीन नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू झाल्याने काँग्रेस समोर आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे व्ही. डी. सतीशन यांना समर्थन आहे. सतीशन यांनी घेतलेल्या भूमिकांमुळेच पक्षाला कौल मिळाला असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सतीशन यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला आहे. सतीशन मागील पाच वर्षांपासून केरळमध्ये यूडीएफचे नेतृत्व करतात. त्यामुळे या विजयात त्यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे.

कोणत्या तीन नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढली?
सतीशन व वेणुगोपाल यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी मुख्य लढत होत असताना, काँग्रेसमधील एका गटाला रमेश चेन्निथला यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी निवड व्हावी, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने चेन्निथला यांना मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी चेन्निथला यांच्या समर्थकांकडून होत आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडून आलेले बहुसंख्य आमदार वेणुगोपाल यांना पाठिंबा देत आहेत. वेणुगोपाल हे केरळचे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत, तसेच ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. “केरळमध्ये निवडणुकीच्या प्रचारात पैशांची कमतरता पडणार नाही, याची खात्री वेणुगोपाल यांनी केली होती. २०२१ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांकडे कोणताही स्रोत नव्हता. पण यावेळी सगळ्या उमेदवारांना त्यांची क्षमता असो अथवा नसो, स्रोत मिळाला. दरम्यान, सतीशन हे मुख्यमंत्रीपदासाठी नैसर्गिक दावेदार आहेत, हे सगळ्या आमदारांना माहिती आहे”, असे सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
“काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा मुख्यमंत्री निवडण्याचा फॉर्म्युला काय आहे, ते आम्हाला माहिती नाही. पण, काँग्रेसचे मंत्री निवडतानाही स्पर्धा रंगणार आहे. जरी तिघांपैकी एकाला मुख्यमंत्री पद दिलं, तरी त्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे हे ठरवण्याचे अधिकार असतील की नाही, याबाबत शंका आहे. कोणतीही चूक झाल्यास काँग्रेससाठी जुने दिवस परत येतील. (काँग्रेसमध्ये अनेक गट निर्माण होऊन वाद चव्हाट्यावर येतील)”
काँग्रेसच्या मित्रपक्षांचा पाठिंबा कोणाला?
यूडीएफ मधील इंडियन यूनियन मुस्लिम लीग (IUML) ने मुख्यमंत्री पदासाठी सतीशन यांच्या नावाला समर्थन दिले आहे. त्यामुळे वेणुगोपाल यांच्या गोटात अस्वस्थता आहे. अखिल भारतीय काँग्रेस समिती केरळ काँग्रेसच्या मित्रपक्षांची भेट घेत आहे. त्यांचे मत जाणून घेत आहे. केरळ काँग्रेस (जोसेफ) या पक्षाने देखील सतीशन यांना मुख्यमंत्री पदासाठी समर्थन दिले आहे. काँग्रेसचे आमदार मॅथ्यू कुझलनादण यांनी IUML ने सतीशन यांना दिलेल्या पाठिंब्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मुख्यमंत्री काँग्रेस ठरवणार आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने काँग्रेसला कौल मिळाला आहे. एका व्यक्तीने जादू केल्याने हा कौल मिळालेला नाही. मुख्यमंत्री ठरवण्याचा काँग्रेसला इतिहास लाभला आहे. IUML हा पक्ष म्हणजे यूडीएफमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण, IUML च्या सांगण्यावरून काँग्रेस मुख्यमंत्री ठरवू शकेल का?”, असा सवाल कुझलनादण यांनी उपस्थित केला.
काँग्रेस खासदारांचा सतीशन यांच्या नावाला विरोध
काँग्रेसचे खासदार के. सुधाकरण यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती, परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आले. सुधाकरण म्हणाले, “मी त्यांना (पर्यवेक्षकांना) सांगून आलोय की, पक्षात फक्त एक सतीशन नसून अनेक सतीशन आहेत. आपल्याकडे अनेक नेते आहेत. आमदारांचा पाठिंबा असणे सर्वात महत्वाचे आहे. आमदारांच्या मनात काय आहे, ते पर्यवेक्षकांना ओळखू द्यायला हवे. ” सुधारकरण हे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष असताना सतीशन हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी दोघांमधील संबंध बिघडलेले होते.
तीन नेत्यांमध्ये सामंजस्य घडवून आणण्याचे आव्हान
केरळमध्ये यावेळी मुख्यमंत्री निवडणे काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरत आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीतील महत्वपूर्ण नेते असलेले वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने पेच आणखी वाढला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला केरळमध्ये फक्त दोन नेत्यांना सांभाळावे लागत होते. एक म्हणजे के करूणाकरण आणि दुसरे म्हणजे ए.के. अँटनी. यावेळी मात्र तीन नेत्यांमध्ये सामंजस्य घडवून आणण्याचे आव्हान काँग्रेस समोर आहे.
