२०१४च्या लोकसभा निवडणुकांपासून काँग्रेसची राष्ट्रीय राजकारणात पीछेहाट झाल्याचं दिसत आहे. केंद्रातील सत्तेसोबतच अनेक राज्यांमध्येही या ८ वर्षांमध्ये काँग्रेसला फटका बसला. भाजपासमोर कडवं आव्हान निर्माण करण्यात काँग्रेसला आलेलं अपयश हा काँग्रेसमधील थिंक टँकसोबतच राजकीय विश्लेषकांसाठी देखील चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये काँग्रेससाठी एक दिलासादायक बाब नुकतीच घडली आहे. मात्र, त्या आधारावर काँग्रेसला राष्ट्रीय नसली, तरी राज्याच्या राजकारणात पुनरागमन करण्याची संधी निर्माण झाल्याचा विश्वास केरळचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांना वाटतोय.

केरळच्या त्रिक्ककरा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार उमा थॉमस यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) कडून थॉमस यांनी ही निवडणूक लढवली. या विजयामुळे केरळ काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. या विजयाचा सध्याच्या राजकीय वातावरणातला संदर्भ आणि त्यातून साध्य होऊ शकणारे दूरगामी परिणाम याविषयी व्ही. डी. सतीसन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली आहे. कमालीची प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक, धर्मनिरपेक्ष मतांची काँग्रेसला झालेली मदत याविषयीही व्ही. डी. सतीसन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रासह चार राज्यांमधील मतांची आकडेमोड! नेमकी कशी आहेत राजकीय गणितं?

काँग्रेससाठी हा निकाल महत्त्वाचा का आहे?

केरळमधल्या एका मतदारसंघातला विजय काँग्रेससाठी का महत्त्वाचा आहे, याविषयी सांगताना सतीसन म्हणतात, “राज्यात २०१६ आणि २०२१ अशा सलग दोन निवडणुका आम्ही हरलो. देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये सत्ता गमावली, अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या आधी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कमालीचा खाली गेला होता. पण या विजयामुळे आम्हाला कमबॅक करण्याची संधी आणि आशा दिसू लागली आहे”. सत्ताधारी पक्षाविरुद्ध विरोधकांनी एखादी पोटनिवडणूक जिंकणं फार महत्त्वाचं असतं, असं देखील ते म्हणाले. “केरळ सरकारने त्यांची पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. पण सरकारी कारभाराबाबतची नाराजी, केरळ रेल्वे सिल्व्हरलाईन प्रोजेक्ट या गोष्टी आमच्याबाजूने निकाल लागण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या. तसेच, उमा थॉमस यांचे पती आणि दिवंगत काँग्रेस नेते पी. टी. थॉमस यांची लोकप्रियता देखील आमच्यासाठी महत्त्वाची ठरली”, असं सतीसन म्हणाले.

“आमचे आणि विरोधकांचेही कच्चे दुवे दिसले”

खुद्द काँग्रेस पक्षासोबतच विरोधी पक्षांचे देखील कच्चे दुवे, जमेच्या बाजू या निवडणुकीतून समोर आल्याचं सतीसन म्हणाले. “आम्हाला वाईट पद्धतीने निवडणुकांची तयारी करण्याचा इतिहास आहे. केरळ काँग्रेसकडे निवडणुकांकडे सुनियोजित पद्धतीने बघण्याचा दृष्टीकोनच नाही. पण यावेळी आम्ही या सर्व अडचणींवर मात करू शकलो. या विजयामुळे कठोर मेहनत आणि नियोजित गृहपाठ केल्यास आम्ही कोणत्याही निवडणुकीत विजय मिळू शकतो, हे या विजयामुळे स्पष्ट झालं. आता भविष्यातील निवडणुकांमध्ये देखील आम्ही हीच पद्धत वापरणार आहोत”, अशा शब्दांत सतीसन यांनी या निवडणुकीचं महत्त्व स्पष्ट केलं.

राममराजे नाईक – निंबाळकर : पवारांचे विश्वासू आणि साताऱ्यातील आधारस्तंभ!

धर्मनिरपेक्ष भूमिका आणि मतदान

या निवडणुकीत आम्ही आमच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेपासून अजिबात फिरलो नाही आणि त्याचं फळ आम्हाला मिळालं, असं सतीसन म्हणाले. सत्ताधारी नेते पी. सी. जॉर्ज यांची भाषणं ही द्वेषपूर्ण असायची. पण आम्ही या विद्वेषाच्या राजकारणाला फाटा देत धर्मनिरपेक्ष भूमिकेचा आग्रह धरला. कर्नाटकमधील बहुसंख्य नागरिक हे धर्मनिरपेक्ष आहेत. आम्हाला हे पक्कं ठाऊक आहे की केरळमध्ये एका सक्षम धर्मनिरपेक्ष विरोधीपक्षासाठी व्होटबँक नक्कीच आहे”, असं ते म्हणाले.