BJP Response Kerala Story 2 Controversy : तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने देशात वादंग निर्माण झाला होता. प्रेमाचे प्रलोभन दाखवून हिंदू तरुणींना मुस्लीम तरुणांकडून लक्ष्य केले जात असल्याचे या चित्रपटाच्या कथेतून दाखवण्यात आले होते. अंगावर शहारे आणणाऱ्या या कथेला त्यावेळी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यादरम्यान चित्रपटाचा दुसरा भाग ‘द केरला स्टोरी २’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वीच त्याच्या कथेवरून पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाला द्वेष पसरवणारा चित्रपट, असे संबोधले आहे. त्यांच्या टीकेला भारतीय जनता पार्टीतील नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याविषयीचा हा आढावा…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ‘द केरला स्टोरी २’ हा द्वेष पसरवणारा चित्रपट असल्याची टीका गुरुवारी (१९ फेब्रुवारी) केली. त्यांच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पिनराई विजयन यांचे मुख्यमंत्री म्हणून आता केवळ ४५ दिवस शिल्लक असून, ४६ व्या दिवशी त्यांना आपले शासकीय निवासस्थान सोडावे लागणार आहे. ‘द केरला स्टोरी २’ या चित्रपटावर त्यांनी केलेले विधान हे त्यांच्या सरकारचे गेल्या १० वर्षांतील अपयश लपवण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना विजयन हे राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांवर उठवली टीकेची झोड

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्या भूमिकेला दुटप्पीपणा असे संबोधले. जेव्हा एखादा चित्रपट भाजपाच्या विरोधात येतो, तेव्हा विजयन त्याचे स्वागत करतात आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. आम्ही कधीही अशा चित्रपटांचा निषेध केला नाही किंवा त्यावर बंदीची मागणी केली नाही. मग आता जेव्हा त्यांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधात एखादा चित्रपट तयार केला जात असेल, तर त्यांना अचानक समस्या का निर्माण होतात? हा निव्वळ दुटप्पीपणा असल्याची टीका चंद्रशेखर यांनी केली. निर्मात्यांना चित्रपट तयार करण्याचा आणि प्रेक्षकांना तो पाहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा : शिंदेंचा शिलेदार भाजपाच्या रडारवर? महापौरपदावरून भाजपात मोठी फूट? वाचा ५ महत्वाच्या घडामोडी…

“उगाच द्वेष पसरवण्याचे काम करू नका”

कोणीही तुम्हाला जनतेचा रक्षक म्हणून नियुक्त केलेले नाही. कोणत्याही समुदायाचे रक्षणकर्ते असल्यासारखे वागण्याची तुम्हाला गरज नाही. प्रत्येक भारतीयाला आणि मल्याळी नागरिकाला संविधानाने समान मूलभूत अधिकार दिले आहेत. जनतेला मूर्ख बनवणे थांबवा आणि उगाच चित्रपटाविषयी द्वेष पसरवण्याचे काम करू नका. निर्मात्यांना चित्रपट तयार करण्याचा आणि प्रेक्षकांना तो पाहण्याचा पूर्ण अधिकार असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होईलच, असेही चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले. जर चित्रपटात खरोखरच काही बेकायदा कृत्य असेल, तर विजयन यांनी त्यावर वक्तव्ये करण्यापेक्षा न्यायालयात जावे. मुख्यमंत्री पदाचा वापर करून उगाच जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका, असा इशाराही चंद्रशेखर यांनी दिला.

पिनराई विजयन यांची भूमिका काय?

द केरला स्टोरी २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मुख्यमंत्री विजयन यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करून, त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा चित्रपट समाजात द्वेष पसरवणारा असून, त्यामुळे राज्यात सांप्रदायिक हिंसाचार उफाळून येऊ शकतो. या चित्रपटाचा सीक्वेल काढणे हा राज्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. पहिल्या भागात आम्ही त्यांचा जातीय अजेंडा आणि खोटेपणा उघडपणे पाहिला आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांना बदनाम करण्याचा हा आणखी एक प्रयत्न राज्यातील जनता पुन्हा एकदा तिरस्काराने नाकारेल, असे विजयन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

हेही वाचा : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद? कोण आहेत? टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद कसा निर्माण झाला?

चित्रपटाचा वाद थेट उच्च न्यायालयात

‘द केरला स्टोरी २’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यासंबंधीचा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासह सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. पेशाने जीवशास्त्रज्ञ असलेल्या श्रीदेव नंबुदिरी यांनी त्या संदर्भातील याचिका दाखल केली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि नकारात्मक स्वरूपात मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्याचा मुख्य आक्षेप हा चित्रपटाच्या नावावर आहे. टीझरमध्ये इतर राज्यांतील कथा असल्या तरी चित्रपटाचे नाव ‘द केरला स्टोरी २’ ठेवल्यामुळे या सर्व घटना फक्त केरळमध्येच घडत असल्याचा समज निर्माण होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्याची मागणी श्रीदेव यांनी याचिकेतून केली आहे.

‘द केरला स्टोरी २’ चित्रपटात नेमके काय?

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले होते. संपूर्ण देशातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. आता नव्याने प्रदर्शित होणाऱ्या ‘द केरला स्टोरी २’ चित्रपटाचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे. मुस्लीम मुले हिंदू तरुणींशी निकाह करून, त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याचे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. पहिल्या भागात अभिनेत्री अदा शर्माची प्रमुख भूमिका होती. आता दुसऱ्या भागात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा व अदिती भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळ, मध्य प्रदेश व राजस्थानमधील तीन तरुणींची कथा दाखवण्यात आली आहे.