चांगले रस्ते दळणवळणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असतात. त्यामुळेच खराब रस्त्यांविरोधात सर्वसामान्य नागरिक अनेकदा आंदोलन करताना दिसतात. मात्र, झारखंडमध्ये राष्ट्रीय महामार्गाचीच दुरावस्था झाल्याने थेट काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक झाल्या आहेत. गोड्डा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३३ च्या दयनीय स्थितीवर आमदार दीपिका पांडे सिंह यांनी चिखलात ठिय्या आंदोलन केलं. तसेच जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा इशारा दिला.

आमदार दीपिका सिंह यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे.

एका व्हिडीओत दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, दीपिका सिंह यांनी राष्ट्रीय महामार्गाचं काम करण्याची जबाबदारी खासदार निशिकांत दुबे यांच्यावर आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच जोपर्यंत हे काम सुरू होत नाही तोपर्यंत चिखलातून उठणार नाही, असा इशारा दिला.

आमदार दीपिका सिंह यांनी ट्विटरवर आपल्या आंदोलनाबाबत ट्वीट करताच राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या. खासदार दुबेंनी आमदार दीपिका सिंह मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात आंदोलन करत होत्या असा प्रचार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करणं राज्य सरकारचं काम असतं असाही दावा करण्यात आला. केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वीच या महामार्गाच्या देखभालीसाठी ७५ कोटी रुपये दिले होते, असंही खासदार दुबेंकडून सांगण्यात आलं. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणात राज्य सरकारवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी केली.

खासदार दुबेंनी असा दावा केला असला तरी सरकारी खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या ज्या भागावरून आंदोलन सुरू आहे त्याच्या देखभाल दुरुस्तीशी राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही. १३१ किलोमीटरचा हा महामार्ग बिहारमधील पिरपैंती येथून सुरू होतो आणि झारखंडमधील देवघरच्या चौपा मोड येथे संपतो.

दुसरीकडे झारखंड रोड कन्स्ट्रक्शन विभागाचे मुख्य अभियंता वाहिद कमर फरिदी यांनी एक निवेदन जारी करत झारखंड सरकारला केंद्र सरकारकडून देखभाल निधी मिळाला नसल्याचं सांगितलं. तसेच सध्या तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम राज्य सरकारच्या खर्चाने सुरू असल्याचं नमूद केलं.

हेही वाचा : विश्लेषण : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, झारखंडमधील सत्तासंघर्षाचं नेमकं कारण काय?

यानंतर आमदार दीपिका सिंह यांनी खासदार दुबेंवर जोरदार हल्ला चढवला. निशिकांत दुबे यांना लाज वाटली पाहिजे. ते त्यांच्या सवयीप्रमाणे दोषारोप करण्याचं काम करत आहेत. यानंतर दुबेंनी आमदार सिंह यांनी केलेली टीका अपमानजनक असल्याचा आरोप केला. एनएचएआयकडून या प्रकरणात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.