कोल्हापूर : एकाच कुटुंबावर अवलंबून राहून पारंपरिक राजकारण करणे काँग्रेस पक्षाला अडचणीचे ठरत असल्याचा आणखी एक अध्याय कोल्हापूर जिल्ह्यात जोडला गेला आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी नाते जोडलेल्या गायकवाड घराण्यातील तरुण पातीने जनसुराज्य शक्ती पक्षाचा हात पकडला आहे. यामुळे कोल्हापुरातील काँग्रेसचा आणखी एक आधार तुटला आहे.

शेकापच्या बालेकिल्ल्यात दिवंगत नेते उदयसिंगराव गायकवाड यांनी साठच्या दशकात शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे खाते उघडल्यापासून ते पुढे गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकत राहिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने का असेना काँग्रेसचे अस्तित्व या शाहुवाडी तालुक्यात राहिले होते. परंतु, करणसिंग गायकवाड यांच्या जनसुराज्य शक्ती पक्ष प्रवेशाने या तालुक्यातील काँग्रेसच्या आशा निस्तेज झाल्या आहेत. नव्या दमाचे नेतृत्व तयार करण्यासाठी या तालुक्यात काँग्रेस पक्षाला खस्ता खाव्या लागणार आहेत.

काँग्रेसचा उदयास्त

स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि शेकाप यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ऐतिहासिक व सामाजिक आदर्श वारसा लाभलेल्या शाहूवाडी तालुक्यात प्रारंभीच्या काळात शेकापचे वर्चस्व राहिले. साठच्या दशकात उदयसिंगराव गायकवाड या युवा नेतृत्वाने येथे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवला. पुढे गायकवाड हे कोल्हापुरातून लोकसभेला निवडून गेले. पुढे सलग पाच वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. दुसरीकडे विधानसभेचा वारसा त्यांचे पुतणे संजयसिंह गायकवाड ( तीन वेळा ) आणि सून संजीवनी गायकवाड ( पोटनिवडणुकीत एकदा) यांनी चालवला. सन दोन हजारनंतर या तालुक्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाला उतरती कळा लागली. आमदार दांपत्याचे पुत्र करणसिंह गायकवाड यांनी २००४ ची विधानसभा निवडणूक लढवून पाहिली. परंतु यशाने काही हात दिला नाही. पुढे त्यांच्या पत्नी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी होत राहिल्या इतकेच काय ते या तालुक्यातील काँग्रेसचे मिणमिणते अस्तित्व राहिले.

सरूडकरांचे आव्हान

दरम्यानच्या, काळात या तालुक्यात सरूडकर पाटील कुटुंबाचाही प्रभाव दिसून आला. बाबासाहेब पाटील सरूडकर आणि गेल्यावेळी हातकणंगले लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेनेकडून लढवणारे त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटील सरूडकर या पिता पुत्रांनी प्रत्येकी दोनदा निवडणूक लढवून काँग्रेसचा हा बुरुज खिळखिळा केला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पन्हाळा – शाहूवाडी असा एकत्रित मतदारसंघ झाला. या नव्या मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर यांचा एकदा विजय झाला. पुढे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी या मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला.

कोरे भक्कम – काँग्रेस दिशाहीन

बेरजेचे राजकारण करीत आमदार कोरे यांनी पन्हाळा मतदारसंघातील काँग्रेसचे दिवंगत आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र अमरसिंह पाटील व शाहूवाडी तालुक्यातील दिवंगत आमदार गायकवाड यांचे सुपुत्र करणसिंह गायकवाड यांना आपल्या बाजूने वळवले. या दोघांनाही गोकुळ दूध संघाचे संचालकपदाचे मलईदार नवनीत दिले. पाटील – गायकवाड हे दोघेही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जात होता. या दोन्ही तरुण नेतृत्वाच्या आधारे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्याचे राजकारण करणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना सोपे जात होते. आता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही तरुणांनी विनय कोरे यांना साथ देण्याचे ठरवले आहे. याचे पुढचे पाऊल टाकत करणसिंह गायकवाड यांनी थेट जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शाहूवाडी तालुक्यातील काँग्रेसचे नेतृत्व अस्तित्व दिशाहीन झाले आहे.

युवा नेत्यांची शरणागती

या नव्या घडामोडींमुळे शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसला पुन्हा आधार देऊन पक्षाचे अस्तित्व ठळक करणे हे आता आमदार सतेज पाटील यांच्यासमोरचे कडवे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे विनय कोरे यांनी दोन तालुक्यातील दोन तरुण नेतृत्व आपल्याकडे वळवून बेरजेचे राजकारण साधत आपले अस्तित्व भक्कम केले आहे. त्यांच्या छत्रछायेत राजकारण करू पाहणारे अमरसिंह पाटील आणि करणसिंह गायकवाड यांना लढावू बाणा सोडून मिळेल त्यावर समाधान मानण्याची शरणागत स्थिती दिसत आहे. तालुक्यात राजकीय बांधणी करून, संघर्ष करून वडिलांप्रमाणे विधानसभा गाठण्याचे ध्येय शक्य असताना या दोन्ही तरुण नेतृत्वांनी कोरे यांच्या हाताखाली काम करण्याला महत्व देतानाच आपल्या राजकीय मर्यादांचे सिमित वर्तुळही दाखवून दिले आहे.