कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या वृक्ष समिती प्राधिकरणाच्या बैठकीतच एकनाथ शिंदे शिवसेनेचे शारंगधर देशमुख आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास या दोन्ही माजी स्थायी समिती सभापतींमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकाला बघून घेण्याची, शड्डू ठोकून धमकावण्याची, खाली चौकात ये बघून घेतो, अशी तद्दन गावगुंडांच्या तोंडी असणारी भाषा झाली. सत्तेत असणारे प्रमुख पक्षच रस्त्यावरच्या गुंडगिरीसारखी भाषा वापरतात, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे काय, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

मार्च महिन्यामध्ये या दोघांमध्ये असाच वाद उद्भवला होता. तेव्हा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली होती. ‘सभागृहाचा आखाडा करू नका, अन्यथा खासबाग मैदानात कुस्ती लावू,’ असा खोचक इशारा त्यांनी नगरसेवकांना दिला होता. मंत्र्यांच्या मध्यस्थीला आणि कानटोचणीला स्थानिक नेते जुमानत नसल्याने महायुतीमधील शिस्त पूर्णपणे कोलमडली आहे, हे स्पष्ट होते. वेळीच या नेत्यांवर पक्षांतर्गत कडक कारवाई केली नाही, तर हा राजकीय आखाडा कोल्हापूरच्या विकासालाच सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही, अशी सत्वहीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

काँग्रेसला सत्तेतून पायउतार केल्यावर सत्तेची खुर्ची मिळताच एकजुटीच्या गप्पा मारणाऱ्या कोल्हापूर महापालिकेतील महायुतीचा पहिल्याच सर्वसाधारण सभेआधी बुरखा सहा महिन्यांपूर्वी फाटला होता. स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सभापतीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष उफाळला होता.

महायुतीच्या एका बैठकीत स्थायी समितीवर कोणाला घ्यायचे यावरून धुसफूस सुरू असतानाच परिवहन समितीचा विषय निघाला. महायुतीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी परिवहन सभापतीपद राष्ट्रवादीच्या मानसी लोळगे यांना देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी डावलून आपल्याच गटाचे नगरसेवक सत्यजित जाधव यांचा अर्ज भरल्याचे समोर आले होते. यावर राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांनी जाब विचारताच देशमुख संतापले. दोघांमध्ये तू-तू मैं-मैं सुरू झाली. काही मिनिटांतच ती हातघाईपर्यंत पोहोचली. ‘तू कोण मला विचारणारा, दम असेल तर चौकात ये’ अशी एकेरी भाषा दोन्ही बाजूंनी वापरली गेली होती.

मुश्रीफांचा कुस्तीचा इशारा

या गदारोळात भाष्य करताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांनी जाहीर माफी मागितली होती. “राष्ट्रवादीचा गटनेता असल्याने मी माफी मागतो. सभागृहात विकासावर बोलावे. चौकात ये, ही भाषा शोभत नाही. ऐकले नाही तर दोघांची खासबाग मैदानात कुस्ती लावू”, असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र, मुश्रीफ यांचा इशारा देऊनही ना सेनेचे शारंगधर देशमुख वरमले ना आदिल फरास यांच्या वर्तनात सुधारणा झाली.

कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर शहराचा सर्वांगीण सक्षम विकास होईल, असा दावा महायुतीकडून केला जात होता. प्रत्यक्षात सुधारण्याचे घोडे पेंड खात आहे आणि नगरसेवकांमध्ये एकमेकाला बघून घेण्याची खूप खुमखुमी वाढत चालली आहे. मंत्र्यांनी इशारा देऊनही शारंगधर देशमुख – आदिल फरास यांच्यात पुन्हा वाद पेटल्याने आता कोल्हापूरकर थेट हसन मुश्रीफ यांना म्हणत आहे की, ‘या दोघांचा खासबागातील आखाडा कधी दाखवणार?’

एकंदरीतच, कोल्हापूरच्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या भूमीवर लोकप्रतिनिधींनी दाखवलेली ही असहिष्णू संस्कृती शहराच्या सुसंस्कृत प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. आता मंत्री आणि पक्षश्रेष्ठी यावर काय कठोर पावले उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.