कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक तीन महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सत्तातुर मंडळींच्या जीवात जीव आला आहे. दिवाळीपूर्वी निवडणूक होणार, असे गृहीत धरून नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांच्यातील संघर्षामुळे महायुतीत दुहीची बीजे पेरली गेली आहेत. विरोधकांचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांना करावे लागत असले तरी त्यांच्यासोबत नेमके कोण जाणार याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे.

चार हजार कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) ताबा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळींचा जीव तीळ तीळ तुटत असतो. सत्तेची मलई आपल्या मोहऱ्यांच्या ताटात पडावी यासाठी नेतेमंडळींचा आटापिटा सुरू असतो. संचालकांकरवी कारभार केला जात असल्याचे चित्र असले तरी महत्त्वाचे अर्थपूर्ण व्यवहार, खरेदी, उलाढाल नेत्यांकडूनच होत असल्याने सत्तेच्या लोण्याचा गोळा त्यांच्या हातीच असतो.

सत्तेसाठी हालचालींना आरंभ

यामुळे गोकुळ दूध संघाच्या सहा दशकांच्या इतिहासात प्रथमच प्रशासक नियुक्त झाल्याने सत्तातुरांची चांगलीच भंबेरी उडाली होती. प्रशासक कालावधी किती काळ लांबणार आणि या कालावधीत गोकुळ मधील भ्रष्टाचाराची गुपिते थेट वर्षापर्यंत पोहोचणार या भीतीने संचालक, नेत्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक ९० दिवसांमध्ये घेण्याचे आदेश दिल्याने सत्तेचे वेध लागलेल्यांना हायसे वाटू लागले आहे. लगेचच त्यांच्याकडून सत्तेसाठी फासे टाकले जाऊ लागले आहेत.

मुश्रीफ – पाटील मतभेद

गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचा घोषा गोकुळचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सातत्याने लावला आहे. त्यांचे जुने मित्र, आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ हे गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे १२ हजार वेळा म्हणाले आहेत, अशी खोचक टिप्पणी करून आम्हाला वेगळा मार्ग चोखाळावा लागेल. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढू, असे म्हटले आहे. त्यावर मुश्रीफ यांनी एकदा नव्हे तर १३ हजार वेळा महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे, अशी मल्लिनाथी करीत सतेज पाटील यांना टोला लगावला होता. गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या हसन मुश्रीफ – सतेज पाटील यांच्यातील दोस्तांना संपुष्टात येऊन ऐन निवडणुकीवेळीच वाटा वेगळ्या दिशेने जात आहेत.

महायुतीत गुंतागुंत

तथापि, महायुतीमध्ये सध्या हसन मुश्रीफ विरुद्ध शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे अशी उभी दरी पडली आहे. त्यामुळे महायुतीच्या पॅनेलमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या समर्थकांना संधी मिळणार का, मिळाली तर ती पुरेशी, कितपत असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे मिळून गोकुळवर ताबा मिळवण्याची भीती भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. गोकुळचा सत्तासंघर्ष आणि महायुतीत मतभेद तीव्र असताना संघावर तीन दशके नेतृत्व असलेल्या महाडिक कुटुंबातील पुढच्या पिढीतील खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांचे मौन अनाकलनीय असल्याने महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

सतेज पाटलांचे एकाकी नेतृत्व

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व १० जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात महायुतीचा दबदबा निर्माण झाल्याने काँग्रेससह विरोधकांची स्थिती अगदीच कमकुवत बनली आहे. अशा स्थितीत आमदार सतेज पाटील यांनी समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे म्हटले आहे. तथापि, सत्तेतील महायुतीचा भरभक्कम हात सोडून त्यांच्यासोबत कोण जाणार का, हे लक्षवेधी बनले आहे. अशा स्थितीत सतेज पाटील यांना महापालिकेप्रमाणे एकाकी लढत करण्यावाचून पर्याय नसल्याचे तूर्तास दिसत आहे.