कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तसा अद्याप पुष्कळसा अवधी असला तरी त्याचे पडघम कोल्हापूर जिल्ह्यात आतापासून वाजू लागले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेकडून पुन्हा एकदा माजी खासदार संजय मंडलिक यांना उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. तथापि मंडलिक यांचा जनसंपर्क आणि सक्रियता यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. खेरीज, मंडलिक यांच्या कागल तालुक्यातूनच हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, संजय घाटगे अशा तिन्ही प्रमुख नेत्यांकडून विरोध होण्याची चिन्हे असल्याने मंडलिक यांची वाट किती बिकट आहे याचेही आराखडे बांधले जात आहेत.
लोकसभा निवडणूक होऊन दोन वर्षाचा अवधी होत आला आहे. पुढील निवडणुकीला अजून तीन एक वर्षाचा कालावधी उरला आहे. मात्र या निवडणुकीवरून कोल्हापुरातील राजकारण आताच तापले आहे. २०२४ मध्ये कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे शाहू छत्रपती महाराज आणि तत्कालीन खासदार संजय मंडलिक यांच्यात लढत झाली होती. या लढतीत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण ठेवत कोल्हापूरकरांनी श्रीमंत शाहू महाराज यांना भरभरून मतदान केल्याने ते सव्वा लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले झाल्याने मंडलिक यांचे दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंगले होते.
विरोधकांचे आडाखे
खासदार झाल्यानंतर शाहू छत्रपती यांची संसदेतील कामगिरी, मतदार संघातील संपर्क, विकास कामे, काँग्रेस पक्षातील सक्रिय योगदान याबाबतच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अद्याप एकही उल्लेखनीय विकासात्मक कार्य झाल्याची नोंद नाही. अशी बाजू विरोधकांकडून मांडली जात आहे. या आधारेच आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा यश मिळवण्याचे आडाखे विरोधकांकडून मांडण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक हे उमेदवार असतील अशी जणू घोषणाच केली. जे उमेदवार असतील त्यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
मंडलिकांच्या मर्यादा
तथापि, उमेदवार निश्चितीच्या पातळीवर मंडलिक यांच्यासमोर दोन महत्त्वाच्या अडचणी उद्भवणाऱ्या आहेत. पहिली, खुद्द त्यांच्या प्रतिमेची. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय मंडलिक यांचा मतदारसंघाशी फारसा संपर्क उरलेला नाही. शिवसेनेतही हवी तितकी सक्रियता दिसत नाही. घराण्यातील तिसरी पिढी भाषणबाजी पुरती तरबेज आहे. पक्षीय बांधणीपेक्षा गट बांधणीला महत्त्व दिले जाते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी चार वेळा विधानसभा, तितक्याच वेळा लोकसभा निवडणुका जिंकल्या. राज्यात मंत्री म्हणून प्रभावी काम केले होते. मात्र, त्यांच्या कामाची धडाडी, संपर्कातील सातत्य, प्रभावी वक्तृत्व हे पुढच्या पिढीमध्ये तितक्या तोलामोलाने अंगी उतरल्याचे दिसत नाही. यामुळे संजय मंडलिक यांचा संपर्क अभाव, पक्षीय कामातील शैथिल्य हा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो.
कागलमधूनच विरोध
दुसरीकडे, मंडलिक हे महायुतीमध्ये असले तरी त्यांना खुद्द कागल तालुक्यातील महायुतीच्याच नेत्यांकडून पहिल्यांदा प्रखर विरोध होण्याची चिन्हे आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कागल तालुक्याचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भाजपात घरवापसी केलेले समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे हे तिन्ही नेत्यांविरोधात संजय मंडलिक यांचे चांगलेच वाजले होते. तेव्हा तीन नेते एकीकडे आणि एकाकी मंडलिक दुसरीकडे असे ठळक चित्र दिसून आले होते. त्या निवडणूकीवेळी झालेल्या खालच्या पातळीवरील आरोप – प्रत्यारोपाच्या खुणा ताज्या आहेत. एकमेकांविषयी टोकाची भाषा केली गेली असल्याने मने दुखावलेले तालुक्यातील हे तिन्ही नेते मंडलिक यांच्या बाजूने उत्साहाने उतरण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मुळातच गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी मंडलिक यांच्या प्रचार तालुक्यातील अन्य नेत्यांकडून केला नव्हता असा आरोप उघडपणे केला गेला होता.
महायुतीकडून दुसरा उमेदवार?
कागल तालुक्यात मंडलिक घराणे मोठे होऊ न देणे हे सुद्धा या तिन्ही नेत्यांच्या दृष्टीने राजकीय भवितव्यातील पेरणी मानली जाते. त्यामुळे याही पातळीवर मंडलिक यांना खो बसण्याची चिन्हे आहेत. शिवाय, भाजपने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढायचे ठरवले आणि आगामी विधान परिषदेला संधी न मिळाल्यास समरजित घाटगे हे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे याही पातळीवर मंडलिक यांना शह मिळू शकतो असाही तर्क व्यक्त केला जात आहे.
