कोल्हापूर : दशकभरापूर्वी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या जागांपेक्षा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी यावेळी विजयाच्या आकड्याची रेष अधिकच वाढवली. तथापि महायुतीच्या सांघिक शक्ती पुढे त्यांची रेष लहान पडली. या तिन्ही पक्षांनी मिळून ओढलेली रेष काँग्रेस, ठाकरे सेनेपेक्षा मोठी ठरल्याने ते सत्तेचे मानकरी ठरले आहेत. काँग्रेस, शिंदे सेना वगळता इतर पक्षांना गतवेळेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक दहा वर्षानंतर झाली. पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. करवीरनगरीतील हा सामना मुख्यत्वे करून काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील विरुद्ध महायुतीतील बलाढ्य नेते असाच राहिला. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या २७ जागा खेचून आणल्या होत्या. यावेळी हा आकडा ३५ वर गेला आहे. एकाकी लढूनही त्यांनी मिळवलेले हे यश उल्लेखनीय असेच ठरले आहे. राज्यात अन्यत्र महापालिका मतदारांनी काँग्रेसचा हात सोडला असला तरी कोल्हापुरात मात्र काँग्रेसशी हात मिळवणी अजूनही टिकून असल्याचे दिसून आले.

मागील निवडणुकी वेळी सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे स्वतंत्रपणे लढले असले तरी दोघांची अंतर्गत छुपी आघाडी असल्याची उघड चर्चा होती. शिवाय, विधानसभा आणि महापालिका निवडणूक यांच्यातील सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात अंतर्गत साटेलोटे असल्याची चर्चा रंगायची. यावेळी महायुतीने एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला होता. नाही म्हटले तरी जागा वाटपावरून कुरबुरी वाढल्या होत्या. त्यावर मार्ग निघाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी ऐक्याची मोट बांधली. त्यांनी सांघिकपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

तथापि प्रभागांमध्ये महायुतीचा पुरेसा समन्वय दिसून आला नाही. एका प्रभागात चार सदस्य निवडून द्यायचे होते. अनेक प्रभागात महायुतीचे दोन-तीन प्रकारचे वेगवेगळे चिन्ह असल्याने मतदार गोंधळून गेले होते. त्याचे नियोजन लावण्यात महायुतीचे वरिष्ठ नेते काही प्रमाणात कमी पडले. त्याकडे अधिक लक्ष दिले असते तर महायुतीचा यशाचा आलेख आणखी उंचावला असता.

कोल्हापूर महापालिकेत गेल्या दोन-तीन वर्षात केलेली कामे महायुतीने लोकांसमोर प्रभावीपणे सादर केली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मिसळ कट्टा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा यामुळे वातावरण निर्मिती चांगली झाली. सत्तेची रसद बरेच काही करून गेली. याचाही महायुतीला सत्तेत येण्यासाठी फायदा झाला. गेल्यावेळी सर्वाधिक ३२ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी २४ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवकांचा आकडा १५ वरून ४ वर घसरला. मागील वेळी संयुक्त शिवसेनेने ४ जागा मिळवल्या होत्या. यावेळी ठाकरे सेनेला १ जागा मिळाली तर शिंदे सेनेने १४ जागा जिंकून प्रभाव दाखवून दिला.

महायुतीचे तीन प्रमुख घटक सत्तेत असताना पुढील काळामध्ये त्यामध्ये समन्वय कसा राहतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी मैदानात असली तरी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शिवसेनेला अवघ्या सात जागा दिल्या होत्या. उर्वरित जागा आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. परिणामी बहुतांशी प्रभागांमध्ये चारही उमेदवारांचे एकच चिन्ह राहिले.

लोकांपर्यंत चिन्ह पोहचवण्यास आणि मतदारांनाही मतदान करण्यास ही बाब सोयीची ठरल्याने काँग्रेसच्या निकालाचा आकडा वधारण्यास मदत झाली. इतके करूनही सतेज पाटील यांना कोल्हापूर काँग्रेसच भारी हे घोषवाक्य सत्तेपर्यंत नेता आले नाही. सर्वाधिक जागा आणण्याची कामगिरी आमदार पाटील यांनी केली असले तरी सत्तेपासून दूर राहण्याची तेच कारणीभूत ठरले. विरोधी पक्षाचे काम करताना काँग्रेस नगरसेवकांवर जबाबदारी मोठीच असणार आहे.