कोल्हापूर : कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात सुरू असलेला वाद आता केवळ शाब्दिक युद्धापुरता मर्यादित न राहता हिंसक संघर्षापर्यंत पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने आणि झालेल्या हाणामारीमुळे या वादाचे गंभीर राजकीय परिणाम आगामी काळात कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणावर उमटण्याची दाट शक्यता आहे. या वादामुळे कोल्हापूरचे राजकारण आता अधिक आक्रमक आणि दोन टोकांच्या भूमिकांवर येऊन ठेपले आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात या वादाची पहिली ठिणगी पडली राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे ५०० कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप केला. त्यावर शेट्टी यांनी कोल्हापुरातील बिंदू चौकात येऊन आपल्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे सात-बारा क्षीरसागर यांना देण्याचे आणि क्षीरसागर यांनी त्यांची सर्व मालमत्ता महालक्ष्मी मंदिराला दान करण्याचे आव्हान दिले होते. मात्र याकडे क्षीरसागर फिरकले नसल्याने नैतिक पातळीवर शेट्टी सरस ठरले. आता वर्षभरानंतर शक्तिपीठ मुद्द्यावरूनच या दोघांतील संघर्षाचे दुसरा अध्याय सुरू झाला आहे.
शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक पवित्रा घेत राजू शेट्टी यांनी मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करण्याचे आवाहन केले. तर सत्तेत असलेल्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी त्याला प्रत्युत्तर देत रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. यामुळे कोल्हापुरात ‘शेतकरी संघटना विरूद्ध सत्ताधारी शिवसेना’ असा थेट संघर्ष प्रस्थापित झाला आहे.
राजू शेट्टी यांच्या राजकारणाचा परिघ शेती प्रश्नांशी निगडीत राहिला. शक्तिपीठ महामार्ग मुद्द्यावरून त्यांना कोकण ते विदर्भ व्हाया मराठवाड्यापर्यंत आपले कार्यक्षेत्र वाढवण्याचा आणि यायोगे शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा सक्षम पर्याय आपसुक हाती लागला आहे. शक्तिपीठ महामार्गाला सुपीक जमीन असलेल्या भागातून प्रखर विरोध असल्याने शेतकऱ्यांचे संघटन करून नेतृत्व करण्याची आयती संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो थांबण्यासाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील लढा अधिक तीव्र होईल. अशातच राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यात संघर्ष अधिक धारधार होण्याची चिन्हे आहेत.
सत्तेत असलेल्या आमदाराच्या समर्थकांकडून आंदोलक कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आणि सार्वजनिक रस्त्यांवर झालेला तणाव यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडून या घटनेचा वापर सत्ताधारी पक्षावर आणि पोलिसांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी केला जाईल. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत हा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटना राजकीय हत्यार म्हणून वापरू शकते. शिवाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दरवर्षीच्या ऊस दर आंदोलनावेळी हिंसक कामकाज पद्धती पाहता प्रत्यक्ष मोजणीवेळी तुंबळ प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात प्रभाव असलेले आमदार राजेश क्षीरसागर हे ग्रामीण भागातील मोजणीवेळी अशीच आक्रमक भूमिका कायम ठेवणार हा प्रश्न आहे. त्यांनी तसाच रोख ठेवला तर कोल्हापूरच्या हिरव्यागार पिकावू भूमीत रक्तरंजित इतिहास लिहण्यापासून रोखणे कठीण होऊन बसेल.
