कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाचे कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग बदलला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. तर, याच शक्तिपीठ महामार्गावरून एकनाथ शिंदे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांच्या भूमिकेतील मतभेद तीव्रपणे पुढे आले आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री, उपमंत्र्यांना भेटून शेती, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा महामार्ग करवीर तालुक्यातून अन्यत्र वळवावा अशी मागणी केली आहे. त्यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांना विरोधकांची भाषा बोलू नये, असे म्हणत डिवचले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेतकऱ्यांची विरोधाची भूमिका लक्षात घेऊन आपण त्यांच्यासोबत राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या अंतर्गत वादातून महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवास कसा राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य शासनाने वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देवी पासून पुढे गोव्यापर्यंत जाणारा शक्तिपीठ महामार्गाची महामार्ग साकारण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला ८५ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता एक लाख कोटीहून अधिक रकमेचा झाला आहे. प्रकल्पाच्या खर्चाची, त्याच्या अवाढव्य क्षमतेची चर्चा होत असताना हा प्रकल्प विरोधामुळे ही चर्चेत आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील, भाजपचे माजी आमदार संजय घाटगे यांचा जोरदार विरोध राहिला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यामध्ये बदल केला आहे. आता हा मार्ग जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याऐवजी सांगली जिल्ह्यातून उत्तरेकडून चंदगड तालुक्यात दक्षिणेकडे जाणार आहे. मात्र नव्या मार्गावरूनही वादाचे पडसाद कायम आहेत.
करवीरचा गुंता
आता या वादामध्ये करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आणि महापुराची तीव्रता वाढवणारा हा प्रकल्प रद्द करून अन्य भागातून हलवण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील १८ बागायती गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असणारे उसासारखे नगदी पीक हातून जाणार आहे. या भागात शेतकऱ्यांची जमीन धारणा अत्यल्प असल्याने जमीन संपादित झाल्यास शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातून कोकण व गोवा येथे जाण्यासाठी आंबा,गगनबावडा, राधानगरी, आंबोली असे चार मार्ग असताना नव्या प्रकल्पाची गरज नाही असेही आमदार नरके यांनी म्हटलेले आहे.
शाब्दिक वाद
ही भूमिका व्यक्त झाल्यानंतर लगेचच आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार नरके हे विरोधकांची भाषा बोलत आहेत अशा शब्दात टीकास्त्र डागले आहे. नागपूर – मुंबई हा समृद्धी महामार्ग साकारल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल कमी कालावधीत बाजारपेठेत पोहचू लागल्याने त्यांचा फायदा झाला आहे. रस्ते हे विकासासाठी पूरक असतात. शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नरके यांनी संयम पाळावा. त्यांनी विरोधाची भाषा बोलू नये, अशी अपेक्षाही क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.
तिसरा कोन
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करीत भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मतदारसंघाचे आमदार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. आबिटकर यांनी शक्तीपीठ महामार्ग आणण्यासाठी माझा पुढाकार होता. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तो रद्द करण्याचे काम मीच केले होते. शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्यासोबत राहण्याची आपली भूमिका राहील, असे म्हणत एका अर्थाने आबिटकर यांनी या प्रकल्पाच्या विरोधातील भूमिका कायम ठेवली आहे. एकूणच, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांच्या मतांतरामुळे शक्तिपीठ महामार्गातील अडचणी आणखीनच वाढताना दिसत आहेत.
