कोल्हापूर : ऊस दरावरून दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील वातावरण सध्या कमालीचे तापले असतानाच सरकार , आंदोलक आणि साखर कारखानदारांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने सत्ताधारी महायुतीची चांगलीच कोंडी झाली

मागील हंगामात साखरेला ४५ ते ७५ रुपये प्रति किलोचा विक्रमी दर मिळाला आणि तोच दर आजही ५० रुपयांच्या आसपास टिकून असतानाही शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) नावाखाली कमी दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर डझनभर संघटनांनी यंदा अधिक म्हणजे प्रतिटन ४५०० रुपये दराची मागणी लावून धरली आहे. ही मागणी केवळ आर्थिक नसून राजकीय अस्तित्वाची लढाई बनली आहे.

विशेषतः या प्रश्नावर कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, साखर कारखानदार आमदार आणि शेतकरी संघटनांमध्ये दोन वेळा झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने सरकारची कोंडी अधिकच वाढली आहे. एकीकडे महायुती सरकारमधील बहुतांश साखर कारखाने सत्ताधारी आमदारांच्याच ताब्यात आहेत. त्यांना आधीचे कर्ज व्याज यामुळे जास्त दर देणे परवडणारे नाही. त्यांनी प्रति टन उताऱ्यानुसार कारखान्यांनी प्रतिटन ३६०० ते ३८०० रुपये दर देण्याचे तयारी दर्शवली आहे. त्यावर शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

त्यातच स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिवाळीच्या तोंडावरच पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील किणी आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे महामार्ग रोको आंदोलनाची घोषणा करून सरकारला थेट आव्हान दिले आहे. हा निर्णय व्यूहरचनात्मक मानला जात आहे.

आंदोलनामुळे साखर कारखान्यांचे गाळप हंगाम ऐन मोसमात थंडावल्याने कारखानदारांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. वेळेत ऊस गाळप न झाल्यास साखर उतारा घटतो आणि त्याचा थेट फटका आर्थिक गणितावर बसतो. देशात साखर साठा कमी असताना चिंताजनक कमी झाला असताना कारखाने लवकर सुरू न झाल्यास दिवाळी साखरेचे दर वाढण्याची भीती आहे भीती सरकार समोर आहे केंद्र सरकार समोर आहे.

एकूणच या आंदोलनातून राजू शेट्टी पुन्हा एकदा शेतकरी नेते म्हणून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असून सरकारला नमवून ४५०० चा दर पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी महामार्गाला रोखून धरण्याचा डाव टाकला आहे. पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांसाठी हा प्रश्न सुटणे राजकीयदृष्ट्या अत्यंत गरजेचे बनले आहे; कारण हा तिढा असाच लांबल्यास त्याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाच्या ग्रामीण मतपेढीला बसू शकतो. त्यामुळे आता केवळ बैठकांचा फार्स न करता, कारखानदारांची नफा-तूट आणि शेतकऱ्यांची न्याय्य मागणी यांचा मेळ घालून राज्य सरकारला मध्यस्थ म्हणून ठोस तोडगा काढावा लागेल. आता शासन या कोंडीतून कसा मार्ग काढते आणि साखर सम्राटांना नाराज न करता शेतकऱ्यांना कसे खुश करते यावरच महायुतीच्या ग्रामीण अर्थ – राजकारणाचे गणित अवलंबून असणार आहे.