कोल्हापूर : राज्यात विधान परिषदेसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असताना वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनाचा धागा पकडत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीतील अनेकांना आमदारकी खुणावू लागली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपकडून इच्छुक असून, पाठोपाठ एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तुलनेने, महाविकास आघाडीत मात्र कमालीची शांतता दिसत आहे.
राज्यात विधान परिषदेच्या २३ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. अशा जागांवर प्रामुख्याने राज्यभरात लौकिक असणाऱ्या प्रमुख नेत्यांना संधी मिळत असल्याचा इतिहास आहे. तरीही काही महत्त्वाचे प्रसंग, निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या पक्षातील वरिष्ठांनी जिल्हा पातळीवरील दुसऱ्या फळीतील प्रमुखांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिलेला असतो. ही सांधेजोड करीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांनी आपापल्या नेत्यांकडे वर्णी लागावी यासाठी कंबर कसली आहे.
भाजपमध्ये स्पर्धा
भाजपचे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षात नव्याने प्रवेश केलेले राहुल आवाडे यांच्यासाठी मागील विधानसभा निवडणुकीवेळी थांबण्याची तयारी दर्शवली होती. तेव्हा त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. जिल्ह्यातील नेते चंद्रकांत पाटील यांनीही गेल्या महिन्यात इचलकरंजीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना संधी देणार असल्याचा पुनरुचार केला. यामुळे या स्पर्धेत हाळवणकर आघाडीवर आहेत. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातून निवडणूक लढवलेले महेश जाधव यांनाही यावेळी अचूक वेळ असल्याचा विश्वास वाटत आहे.
देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जाधव यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असताना त्यांना डावलण्यात आले होते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या वेळी तब्बल चार वेळा महेश जाधव आणि विधान परिषद यांना जोडणारा शब्दप्रयोग केल्याने जाधव यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अलीकडेच कागलचे शाहू सहकार समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पक्षात घरवापसी केली आहे. त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. हे गणित मांडून त्यांनाही या निवडणुकीत संधी मिळण्याची आशा असल्याची चर्चा आहे.
सेना – राष्ट्रवादीत हालचाली
विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्यजित कदम यांनी भाजपातून एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे असलेले कदम यांनी जवळचे नातेसंबंध असूनही हाती धनुष्यबाण घेतले. तेव्हा त्यांना विधान परिषदेत घेण्याचा शब्द देण्यात आला होता. सध्या शिवसेनेकडून राज्यातील वरिष्ठांच्या नावाची चर्चा असली तरी कदम यांनी अद्याप आशा सोडलेली नाही. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश मिळवताना परिषदेवर अध्यक्ष करण्याची कामगिरी केली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या राजकीय कर्तृत्वाला जिल्ह्याध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचीही मोलाची साथ लाभली आहे. त्यांनी गेली दोन वर्ष पक्ष रुजवण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांनी पाटील बाबासाहेब पाटील यांच्या आसुर्ले गावी झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांना विधान परिषदेत घेण्याचा शब्द दिला होता. या आधारे आता पाटील यांनी सुद्धा हालचाली सुरू केल्या असून, त्यांनाही याबाबतीत योग्य वेळ असल्याचे दिसत आहे.
आघाडीत शांतता
विधानपरिषद निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला एकच जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन एकूणच राज्यातील जिल्हा पातळीवरील महाविकास आघाडीमध्ये थंड वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हीच शांतता अनुभवायला येत आहे. शिवाय यासाठी कोणी फारसे इच्छुक असल्याचेही दिसत नाही.
