कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकल्या नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क असल्याचे म्हटले असताना काल अचानक उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याकडे राष्ट्रवादी पेक्षा दोन जागा कमी जागा असल्यामुळे फारसा फरक पडत नसल्याचे म्हणत अध्यक्षपद भाजपकडे मिळावे असा दावा केल्याने महायुती अंतर्गत अध्यक्षपदाचा तिढा वाढत चालला आहे.

आपले जुने मित्र हसन मुश्रीफ यांना महायुतीतून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याची परिस्थिती जाणत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेत मोठा कोण आणि छोटा कोण यावरून युद्ध सुरू आहे. मोठ्या भावाला तेथे मोठे मानले नाही तरी आम्ही मानायला तयार आहोत, असे म्हणत मुश्रीफ यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २० जागा मिळवल्या. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जागांसह त्यांनी २५ सदस्य आपल्याकडे असल्याचे सांगत अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे यावर मुश्रीफ ठाम राहिले आहेत. कोल्हापूर महापालिकेत सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला महापौर दिले. तोच फार्मूला जिल्हा परिषदेसाठीही राहिला पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका दिसत आहे.

भाजपची गोळाबेरीज

याबाबत भाजपकडून आठवडाभर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नव्हती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी छुप्या हालचाली सुरू होत्या. कोणाकडून कितपत पाठबळ मिळेल याचा अंदाज घेतला जात होता. त्यानुसार जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व यड्रावकर गट यांचे पाठबळ मिळण्याचे संकेत गृहीत धरून भाजपने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आपले प्यादे पुढे सरकवले आहे. यातूनच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीला २० जागांचे पाठबळ आहे, असे म्हणत त्यांचा २५ जागांचा दावा खोडून काढला आहे. शिवाय, आमच्याकडे मित्र पक्षांची मिळून १८ सदस्यांचे पाठबळ आहे. राष्ट्रवादीचे २० आणि भाजपचे १८ यामध्ये फार मोठा फरक नाही, असे आकडेमोड करीत अध्यक्षपद भाजपकडे आले पाहिजे, असा दावा करीत मुश्रीफ यांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यावर ग्रामीण भागाच्या राजकारणात तेल लावलेले मल्ल म्हणून ओळखले जाणारे मुश्रीफ यांच्याकडून कोणत्या हालचाली होणार याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुश्रीफ – सतेज एकत्र?

जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर लगेचच सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांना मदतीचा हात देण्याची तयारी दर्शवली होती. आता चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर मुश्रीफ यांची महायुतीमध्ये कोंडी केली जात असताना आमदार पाटील यांनी भाजप राष्ट्रवादीला थोरला भाऊ मानायला तयार नसतील तर आम्ही ते मानायला तयार आहोत असे म्हणत सत्ता स्थापनेसाठी मुश्रीफ यांच्या पाठीशी राहण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषदेतील घडामोडीवर आमची बारीक नजर आहे. खेळ करता आला तर करू, असे म्हणत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी सतेज पाटील यांनी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात चंद्रकांत पाटील यांची सरशी होणार की सतेज पाटील यांच्या पाठबळामुळे हसन मुश्रीफ हे वरचढ ठरणार हे लक्षवेधी ठरले आहे.