कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीने निर्भेळ यश संपादन केले असताना निकालानंतर युती अंतर्गत जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष करण्यासाठी छुपी स्पर्धा सुरू झाली आहे. या दृष्टीने राजकीय फासे टाकायला तिन्ही पक्षातील नेत्यांनी सुरुवात केली आहे. विरोधी बाकावर बसलेले काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी महायुतीतील गोंधळ हेरत दुरावलेले मित्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुसरी यांना समर्थन देण्याची तयारी दर्शवत मैत्रीसाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आहे. यातून वेगळ्या आघाडीचे राजकीय समीकरण आकाराला येणार का याचेही कुतूहल निर्माण झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा महायुतीने विरोधकांपेक्षा तिप्पट म्हणजे ५१ जागा मिळवत निर्विवाद सत्ता मिळवली आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीकडे १७ जागा आहेत. सभागृहातील पक्षीय बलाबलाच्या आधारे अध्यक्ष दिले जाणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या सत्तापदाचा फॉर्मुला जिल्हा परिषदेसाठीही राहणार आहेत.
ही समीकरणे पाहता सर्वाधिक २० जागा जिंकलेल्या अजित पवार राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. या पक्षाचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गोठातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चार सदस्यसह २५ सदस्यांची जुळणी केल्याचा दावा केला आहे. तर भाजप व शिंदे सेना अध्यक्षपद कसे मिळवता येईल यासाठी हालचाली करीत आहेत.
मुश्रीफ – सतेज मैत्री ?
महायुती अंतर्गत छुपी सत्ता स्पर्धा पाहून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी वेगळीच रणनीती अवलंबलेली आहे. काँग्रेसच्या १५, ठाकरे सेना – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक, गारगोटीतील माजी आमदार बजरंग देसाई यांच्या सून तसेच सातवे मतदार संघातील अपक्ष अमर पाटील अशा १८ जणांचे पाठबळ असल्याचा दावा आमदार पाटील केला आहे. या आधारेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडे समर्थन मागितले तर ते देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याद्वारे सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना जुन्या मैत्रीची आठवण करून देत नव्याने दोस्तीसाठी हात पुढे केला आहे. याला मुश्रीफ यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर जिल्हा परिषदेचे राजकारण रंग धारण करणार आहे.
कोरे – यड्रावकर निर्णायक
मुश्रीफ यांनी आपल्याकडे २५ सदस्य असल्याचे म्हणताना त्यात आमदार यड्रावकर यांच्या चार सदस्यांना गृहीत धरले आहे. तथापि यड्रावकर यांनी कोणत्या एका पक्षाचे नाव न घेता आपण महायुती सोबत असल्याचे म्हणत पत्ते राखून ठेवले आहेत. त्यामुळे आमदार विनय कोरे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थन महायुतीत कोणाकडे जाते यावरच जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजप , राष्ट्रवादी की शिंदे सेनेचा असणार हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत महायुती अंतर्गत पडद्यामागील हालचाली, शह काटशयाचे राजकारण सुरूच राहणार असे दिसत आहे.

