कोल्हापूर : जिल्हा परिषदे निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये महायुती अंतर्गतच सामना होत आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात संघर्ष होणार आहे. नगरपरिषद निवडणुकीवेळची समीकरणे जिल्हा परिषद निवडणुकीत दिसत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने शरद पवार राष्ट्रवादी व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस समवेत आघाडी करण्यात आली होती. चंदगड, आजरा पालिकेत ही आघाडी दिसून आली. दोन्ही पालिकांमध्ये भाजपची सरशी झाली. नगरपालिका निवडणुकीवेळचे हे अपयश पुसून काढण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. तर पालिका विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप सज्ज झालेला आहे.

कागल तालुक्यात महायुतीचे हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, भाजपचे माजी आमदार संजय घाटगे हे एकत्रित लढत असून पालिका निवडणुकीप्रमाणेच येथे शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांना बाजूला सारले आहे. एकटे मंडलिक या तिघांपुढे कितपत आव्हान निर्माण करणार हे पाहावे लागेल.

गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाचा गड उध्वस्त करीत हसन मुश्रीफ यांनी झेंडा फडकवला. यामुळे या तालुक्यात राष्ट्रवादीला यश मिळवून देण्यासाठी मुश्रीफ मैदानात उतरलेले आहेत. येथे भाजप, जनता दल यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये काही मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्रित लढत देण्याचे निश्चित करून आखाड्यात उतरले आहेत.

राधानगरी- भुदरगड व करवीर या तालुक्यांमध्ये पालिका – नगरपंचायती नाहीत. यामुळे येथे विधानसभेनंतर  जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होत आहे. राधानगरी – भुदरगड मध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिंदेसेनेच्या अधिकाधिक जागा याव्या यासाठी जोरदार तयारी केलेली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरेसेनेतून पुन्हा अजितदादा गटात परतलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी आव्हान दिले असून आबिटकर यांची रणनीती पाहता त्यांची सरशी होईल असे दिसत आहे.

असाच प्रकार करवीर मध्येही दिसत आहे. येथे शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे दिवंगत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केलेल्या पुत्रांना अधिक जागा देण्याचे नाकारले. परिणामी येथे राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असली तरी नरके यांच्यापुढे त्यांची कितपत डाळ शिजणार याकडे लक्ष लागले आहे. कोल्हापूर लगत असलेल्या या तालुक्यात काँग्रेसच्या अधिकाधिक जागा आणण्याचा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे. या तालुक्यातील काही मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना कडवे आव्हान दिलेले आहे. यामुळे करवीर मधील शिंदेसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस यांच्यातील चौरंगी लढती महत्त्वाच्या ठरल्या.

पन्हाळा – शाहूवाडी तालुक्यात आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्यचे उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मानसिंग गायकवाड तसेच ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी कडवे आव्हान दिले असल्याने येथील पारंपारिक लढतीकडे लक्ष वेधले आहे.  हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांमध्ये महाविकास आघाडी एकसंघपणे लढताना दिसत आहे.

काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी या दोन तालुक्यांमध्ये हवा निर्माण केली आहे. तथापि येथे खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी पालिका निवडणूक पाठोपाठ जिल्हा परिषदेत यशाच्या झेंडा रोवण्याची तयारी केलेली आहे. महापालिका, विधानसभा, नगरपालिका व महापालिका निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने बाजी मारली आहे. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत.