अलिबाग- विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीतील विसंवाद आणि मतभेद उघड झाले आहेत. याचा फायदा महायुतीच्या अनिकेत तटकरे यांना झाला आहे. त्यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत शेकापला महाविकास आघाडीत समावून घेण्यावरून शिवसेना ठाकरे गट नाखूष होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकाप लढवत असलेल्या चारपैकी तीन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार उभे केले होते. ज्याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन महायुतीच्या पथ्यावर पडले आणि रायगड जिल्ह्यातील सातही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते.

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण तरीही शेतकरी कामगार पक्षाने आपले तीन उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणे अटळ होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर विरोधकांच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले. शेकापकडून अरविंद म्हात्रे, मानसी म्हात्रे आणि अनिल चोप्रा यांनी आपले अर्ज मागे घेतले. बाळ माने यांनी मंत्री नितेश राणे यांच्या समवेत जाऊन आपला उमेदवारी अर्ज माघारी घेलता. त्यामुळे महाविकास आघाडीवर बिनविरोध जागा सोडण्याची नामुष्की ओढावली.

महाविकास आघाडीकडे ही निवडणूक जिंकता येईल एवढे संख्याबळ नव्हते. ही वस्तुस्थिती होती. १०१८ पैकी ७०७ हून अधिक मते महायुतीच्या बाजूने होती. मात्र म्हणून घोडेबाजार रोखण्याचे कारण पूढे करून निवडणुकीच्या रणांगणातून काढता पाय घेतल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष टिकेचे धनी ठरले आहेत. निवडणूक बिनविरोध झाल्याने, शिवसेना ठाकरे गटासह शेकापबाबतही नाराजी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद आणि विसंवाद हे सातत्याने महायुतीच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती कोकणवासीयांना आली आहे.

माघारीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शेकापमध्ये नाराजी

निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली. पण बाळ माने यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या निर्णयावरून आता पक्षात असंतोष दिसू लागला आहे. पक्षातील निष्ठावंतांना दूर ठेऊन बाळ माने यांच्यावर विश्वास टाकण्याचा निर्णय पक्षाच्या अगंलट आल्याची चर्चा सरू झाली आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्यामुळे शेकापमध्ये नाराजीचा सूर आहे. पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्याने, नाराज झालेल्या अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे वरीष्ठ नेतेच तटकरे यांना मॅनेज झाल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.