Kunal Kamra Slams Eknath Shinde Sena Leaders : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधिमंडळ समितीसमोर माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. या प्रकरणाला काही महिन्यांचा अवधी लोटला असतानाच आता शिंदेसेना आणि कामरा यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी स्टँड-अप कॉमेडियन्सना दिलेल्या कथित धमकीचा मुद्दा उपस्थित करताना कुणाल कामराने शिंदेसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांना लक्ष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाला कुणाल कामरा?
कुणाल कामराने मंगळवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने मनीषा कायंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील आमदारांना आता आपल्या घटनात्मक स्वातंत्र्याची नव्याने व्याख्या करायची असल्याचे दिसून येते. माझ्याविरोधात अखंड कायदेशीर कारवाई सुरू ठेवणे आणि मला राज्यात एकही स्टँड-अप शो करण्यासाठी व्यासपीठ मिळू न देणे एवढ्यावरच त्यांचे समाधान झालेले नाही, असे कामरा याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्यानंतर महाराष्ट्र सरकारने आपल्याला राज्यात एकही स्टँड-अप कॉमेडी शो करण्याची परवानगी दिलेली नसल्याचा दावाही त्याने केला.
कुणाल कामराचा इशारा काय?
आपल्या पोस्टमध्ये मनीषा कायंदे यांचा उल्लेख करताना कामरा म्हणाला की, मला आणखी त्रास देण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी तुमच्या धमक्यांना घाबरून मी काम थांबवणार नाही. पक्षाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी सातत्याने टीका करण्यापेक्षा आपण स्वतःच्या कामावर लक्ष द्यायला हवे. दरम्यान, विधान परिषदेतील भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवल्यानंतर कुणाल कामरा आधीच हक्कभंगाच्या चौकशीला सामोरे जात आहे.
कुणाल कामराला कायंदेंची धमकी?
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली होती. “अशा स्टँड-अप कॉमेडियन्सना धडा शिकवला पाहिजे. हे लोक सर्व मर्यादा ओलांडून कोणाचीही थट्टा उडवतात आणि त्यांना हवे ते बोलतात. अशा प्रकारांविरोधात येत्या पावसाळी अधिवेशनात मी ठराव मांडणार आहे,” असे मनीषा कायंदे म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी कुणाल कामराच्या एका व्हायरल विडंबनात्मक गाण्याचाही उल्लेख केला होता. “हे लोक कोणाचीही थट्टा उडवून पैसे कमवतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांना जे हवे आहे ते बोलतात. महाराष्ट्रात असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्टँड-अप कॉमेडियन्सना दुसऱ्याच्या प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करून स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये, असा सल्ला दिला होता.
काय आहे ३७० रुपयांची बिर्याणी वाद?
गेल्या महिन्यात स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या गुडगावमधील एका शोचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात वादंग उठला होता. या व्हिडिओत प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांगडा नावाच्या व्यक्तीबरोबरचा त्याचा संवाद दाखवण्यात आला होता. हिमांशुने शोदरम्यान प्रणीतला सांगितले की, तो एका मुलीला डेटवर घेऊन गेला. तिथे त्यांनी ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली आणि त्याचे बिलही त्यानेच भरले. त्यानंतर ती मुलगी घरी जाण्यासाठी निघाली होती; पण त्याला बिर्याणीचे पैसे वसूल करायचे होते. इथे पैसे वसूल करण्याचा अर्थ म्हणजे हिमांशूा तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते. हा प्रसंग तो सांगत असताना प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता आणि प्रणीत मोरेनेही त्यावर प्रतिक्रिया देताना ‘पीक गुरुग्राम कंटेंट’ असे म्हटले होते. दरम्यान, अशा प्रकारची विधाने केल्याबद्दल प्रणीत मोरे आणि हिमांशू जांगडा यांच्यावर समाजमाध्यमांवरून टीकेची झोड उठली. त्यानंतर मोरेला माफीचा व्हिडिओ शेअर करावा लागला आणि त्याने त्याचे इंस्टाग्राम अकाउंटही बंद झाले. दुसरीकडे- अनेकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हिमांशूला गुडगावमधील त्याच्या कंपनीतून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दावा केला आहे की, या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनाही ओढण्यात आले असून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या मिळत आहेत.
समय रैनाचा जुना व्हिडिओही व्हायरल
याच वादाच्या पार्श्वभूमीवर, समय रैनाचा प्रचंड लोकप्रिय रोस्ट शो ‘इंडियाज गॉट लॅटंट’ मधील एक जुना व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. २०२४ मधील पहिल्या सीझनच्या या व्हिडिओमध्ये समयच्या शोमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेली एक तरुणी अचानक उठून निघून जाते. आश्चर्यचकित होऊन समय तिला त्यामागचे कारण विचारताना दिसून येतो; पण तरुणीबरोबर आलेला तिचा प्रियकर सांगतो की, त्याच्या प्रेयसीच्या वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना जावे लागत आहे. त्यावर समय त्या तरुणाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तू इतका शांत कसा राहू शकतो आणि त्या तरुणीबरोबर का जात नाही. तू तिला खांदा दिला तर ती तुला मान देईल, असे समय रैना म्हणताना दिसून येतो. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या एका मोठ्या वादामुळे समय रैनाला आधीच तीन एफआयआरचा सामना करावा लागला आहे.
कुणाल कामरा शिंदेंबद्दल काय म्हणाला होता?
कुणाल कामरा हा त्याच्या बेधडक आणि बिनधास्त कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्याने आपल्या कार्यक्रमांमधून अनेक नेत्यांची खिल्ली उडवलेली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे सादर केले होते आणि त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली होती. या घटनेनंतर कुणाल कामराला मुंबई सोडावी लागल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कामरा याने माफी मागण्यास नकार दिल्याने विधान परिषदेच्या हक्कभंग समितीने त्याला नोटीसही धाडली आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. आजच्या चौकशीदरम्यान मला विचारण्यात आलेले शेवटचे तीन प्रश्न मला असे आठवतात. ‘तुम्हाला तुमच्या वक्तव्याचा पश्चात्ताप आहे का?’ माझे उत्तर होते, ‘नाही’. ‘तुम्ही केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करता का?’ माझे उत्तर पुन्हा ‘नाही’ असेच होते. त्यानंतर मला सांगण्यात आले की, ‘तुम्ही बिनशर्त माफी मागितली तर या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाईल.’ त्यावरही माझे उत्तर ‘नाही’ असेच होते. कारण अशी माफी मनापासूनची ठरणार नाही. तसेच, यामुळे इतर कलाकार आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चुकीचा पायंडा पडेल, असे कामराने पोस्टमध्ये नमूद केले होते.
