पुणे : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे ते बेंगळुरू या दोन हरित महामार्गांची कामे हाती घेतली आहेत. मात्र, या महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार असल्याने सध्याच्या पुणे-शिरुर-नगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र, शक्तिपीठ महामार्गामुळे लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भूसंपादन टाळण्यात आल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>> निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे ते बेंगळुरू या दोन हरित महामार्गांची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी एनएचएआयने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपन्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर रस्त्याचे आरेखन करून सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र, चालू वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारकडून महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपेन्ट कॉर्पोरेशनची (एमएसआयडीसी) स्थापना करण्यात आली. त्यामुळे ‘एनएचएआय’ऐवजी हे काम ‘एमएसआयडीसी’कडून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सध्या अस्तित्वातील पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम हे सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) खात्याकडे आहे.
हेही वाचा >>> पुणे : अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्यभागात उद्या पहाटे वाहतूक बदल
एमएसआयडीसी आणि पीडब्ल्यूडी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये हरित महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या जुन्या महामार्गाची क्षमता वाढविण्याला प्राधान्य द्यावे. त्यानंतर हरित महामार्गाचे काम हाती घेण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे ते बेंगळुरू या दोन हरित महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. त्यात शेतजमीन, बागायती जमिनींचाही समावेश आहे. शक्तिपीठ महामार्गाला भूसंपादनाच्या मुद्द्यावरूनच तीव्र विरोध करण्यात आला होता. या विरोधाचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. ही बाब लक्षात घेऊन भूसंपादनावरून शेतकऱ्यांचा रोष निर्माण होऊ नये ही बाब विचारात घेऊन पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गासाठी भूसंपादन टाळून केवळ सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.
विविध विकासकामे होणार
सध्याच्या महामार्गावरून दररोज जाणाऱ्या वाहनांची संख्या २५ ते ३० हजार आहे. ही संख्या वाढतच आहे. अस्तित्वातील रस्ता हा २४ मीटर रुंद असून, चौपदरी आहे. या महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रुंदीकरण करणे, महामार्गावर चार उड्डाणपूल उभारणे, महामार्गावर सध्याचे पथकर नाके काढून टाकणे, रस्त्याच्या साइड पट्ट्यांचे डांबरीकरण करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.